कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग एकदा मुख्यमंत्र्यांनी थांबवला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना अशी किंमत देणार आहेत की आजवर ती शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी या प्रकल्पाला तयार होतील अशी भूमिका आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सुरू होणार असून याला सतेज पाटील, राजू शेट्टी यांनी विरोध जोरदार विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत आज मंत्री हसन मुश्रीफ यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. ते म्हणाले की, कोल्हापुरात महामार्गाचे संरेखन बदलण्यासाठी प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा हा प्रकल्प थांबवला होता..आता शक्तिपीठ महामार्गाला आत्तापर्यंत दिले नाही इतका भूमी संपदाचा मोबदला देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका बदलेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटत आहे.

शक्तिपीठ मोजणीवरून संघर्ष होण्याची चिन्हे असताना समन्वयाची भूमिका राखली जाणार का? याबाबत हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी आज भेट होण्याची शक्यता आहे. आम्ही दोघे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करू.

शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य शासनाने मोनार्क नावाच्या कंपनीला भूमी संपादनाचे काम सोपवले आहे. या कंपनीचे लोक शेतात आले तर दरोडखोरांप्रमाणे वागणूक दिली जाईल, असा इशारा राजू शेट्टी केला यांनी दिला आहे. यामुळे परिस्थिती चिघळण्याची चिन्हे आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, एकदा शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. त्याबाबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.

काय घडत आहे?

प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात येत्या ९ सप्टेंबरपासून शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याचा आदेश दिला आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ७३ ते ७४ गावांमधून जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने मोजणीसाठी आल्यास ९ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करत गावबंदी, शिवारबंदी करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.भूसंपादनाच्या विरोधात ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा गावोगावी नोटिसींची होळी करण्याचे नियोजन आहे.