कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत असून मी त्यांच्यासोबत आहे, अशी भूमिका आमदार विनय कोरे यांनी रविवारी मांडली. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, पन्हाळा -शाहूवाडी मतदारसंघातील आमदार विनय कोरे यांची आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघ समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले, या भागात पर्यायी उपलब्ध रस्ते असताना अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या पिकाऊ शेतजमिनी घेऊन महामार्ग करण्याच्या धोरणाशी मी सहमत नाही. शेतकऱ्यांच्या महामार्गाबाबतच्या भूमिका सरकारपर्यंत पोहोचवू. तज्ज्ञांची चर्चा करून या महामार्गास पर्याय सरकारला सुचवू , कायदेशीर सल्ला देखील घेऊ. या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत असून शेतकऱ्यांसोबत आहे. १९ मे रोजी मुंबईला असल्याने मी गैरहजर राहिलो तरी माझे प्रतिनिधी व कार्यकर्ते शक्तिपीठ महामार्ग मेळाव्याला पाठवेन.

गिरीश फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती ही बाधित शेतकऱ्यांचा मंच सर्वपक्षीय आहे. कोल्हापुरातील शेतकरी हे अल्पभूधारक आहे. महामार्गात जमीन गेल्यास ते पूर्ण भूमिहीन होतील. गावागावातील सभांमध्ये शेतकऱ्यांनी कितीही मोबदला दिला तरी आम्हाला जमीन द्यायची नाही अशी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार म्हणून तुम्ही या शेतकऱ्यांच्या या आंदोलनास बळ देण्यासाठी मेळाव्यास उपस्थित रहावे. यावेळी नितीन हुजरे, राजेंद्र जाधव, शिवाजी सिद,दीपक जाधव, राहूल जाधव, किरण पाटील, मच्छिंद्र जाधव,पिंटू भोसले, मिलिंद जाधव, यांच्यासह हातकणंगले-पन्हाळा तालुक्यातील नवे जुने पारगाव, बहिरेवाडी, जाखले, कुशिरे, पोहाळे गावातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

कोल्हापुरात मंगळवारी मेळावा

कोल्हापूर जिल्ह्यातील बदललेल्या रेखांकनाच्या शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा १९ मे रोजी मेळावा आयोजित केला असून त्यासाठी सर्वपक्षीय आजी, माजी आमदार, खासदारांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. बदललेल्या रेखांकनाची अधिसूचना ही ५ मे रोजी जाहीर झाली आहे. यामध्ये कोल्हापुरातील ७८ गावे बाधित होत आहेत. ही अधिसूचना जाहीर होतात या रेखांकनाच्या बाधित गावांमध्ये प्रचंड असंतोष शेतकऱ्यांमध्ये पसरला असून गावागावात निषेध सभा सुरू झाल्या आहेत. नवीन रेखांकनानुसार रस्ता झाल्यास महापुराचे संकट उडवणार आहे. सहा हजार एकर शेती बाधित होऊन साखर कारखान्याच्या ऊस गाळपावर याचा परिणाम होणार आहे. जंगली प्राण्यांनी त्रस्त असलेल्या गावांमध्ये हा त्रास जास्त वाढणार आहे. पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांबरोबर विचार विनिमय करणे, प्रबोधन करणे, त्याबरोबरच लढ्याची पुढील दिशा ठरवणे यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन श्रीराम सोसायटी हॉल, कसबा बावडा येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वयक गिरीश फोंडे, प्रकाश पाटील यांनी दिली आहे.