कोल्हापूर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या अलाइनमेंटचा प्रश्न उपस्थित करत, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक, बागायती शेती वाचवण्यासाठी महामार्गाचे संरेखन तातडीने बदलण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
विधानसभेत बोलताना आमदार नरके म्हणाले की, पवणार (जि. वर्धा) ते पात्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) असा सुमारे ८५६ किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ गावांचा समावेश आहे. या मार्गामुळे हजारो एकर अत्यंत सुपीक, बागायती आणि बहुपीक शेती बाधित होणार आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघातील १७ गावांमधील सुमारे ९४३ एकर क्षेत्र या प्रकल्पामुळे संपादित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरातून पाच नद्या वाहत असल्याने येथील बहुतांश शेती नदीकाठावरील, बारमाही पाण्याची आणि अत्यंत उत्पादक आहे. ही जमीन संपादित झाल्यास शेतकऱ्यांचे आणि बळीराजाचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
आमदार नरके यांनी सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, कोल्हापूर ते कोकण दरम्यान आधीच तीन राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यालाच समांतर नवीन शक्तिपीठ महामार्ग काढल्याने मोठ्या प्रमाणावर शेती बाधित होणार असून त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे.पूर्वीची शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन का बदलण्यात आले, नवीन करण्यामागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला. पूर्वीचे संरेखन (अलाइनमेंट ) कायम ठेवून करवीर विधानसभा मतदारसंघातून जाणारा सध्याचा प्रस्तावित मार्ग बदलावा, जेणेकरून सुपीक शेती वाचेल आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, अशी ठाम मागणी त्यांनी विधानसभेत केली.
शक्तिपीठ महामार्गाच्या सध्याच्या प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक बागायती क्षेत्र वाचवण्यासाठी पर्यायी अलाइनमेंट निश्चित करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी सरकारकडे केली.
