सांगली : शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शुक्रवारी कवलापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी शेतकरी गेली दोन वर्ष झाली संघर्ष करीत आहेत. गरज नसलेला व कुणीही मागणी न केलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शक्तिपीठ महामार्ग करून आमच्या बागायती जमिनी उध्वस्त करू नयेत अशा मागणीचे निवेदन शासन दरबारी वारंवार देण्यात आले आहे.
शक्तिपीठ महामार्ग बाधीत १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकजूट करून राज्यव्यापी लढा उभारण्यात आला आहे. कालपासून परभणी येथे पोलिस दडपशाही सुरू आहे. शेतकरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन हुकूमशाही पद्धतीने वागत आहे.
शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्यावर सुरू असलेल्या दडपशाही चा निषेध तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सोमवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्याचा निर्णय सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्यावतीने शुक्रवारी कवलापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आम्ही जीव देऊ पण शक्तिपीठ महामार्गाला एक इंच जमीन देणार नसल्याचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केला आहे .
मोर्चासाठी सोमवारी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, विश्रामबाग सांगली येथे आपल्या कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन लढ्याचे प्रमुख व शेतकऱ्यांनी केले आहे. यावेळी किसान सभेचे नेते कॉ. उमेश देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, आदिक पाटील, घनश्याम नलावडे, भूषण गुरव, विष्णु सावंत, गजानन सावंत, विष्णु पाटील, उमेश एडके, आनंदा माळी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
