कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी म्हणून ओळखला जाणारा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर ,सांगली जिल्ह्यात विरोध होऊ लागल्याने तो आता सातारा जिल्ह्यातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या नव्या भागातून पुढे कोकणामध्ये जाणार आहे.

मात्र हा शक्तिपीठ महामार्ग माण- खटाव मार्गे वाढवून तो ८५६.९४ किलोमीटर म्हणजेच ५४.९४ किलोमीटर इतके अंतर वाढवला असल्याने आता या महामार्गाचा खर्च १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवला आहे, असे निरीक्षण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नोंदवले आहे. याचाच अर्थ ५४.९४ किलोमीटर रस्त्यासाठी १४ हजार कोटी रूपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला, असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

शक्तिपीठ महामार्गाचा बदललेला मार्ग त्यावरून होणारा खर्च याबाबत राजू शेट्टी यांनी समाज माध्यमात म्हटले आहे की, देवाभाऊ काय चाललंय तुमच? फोंड्या ( उजाड) माळावर तुम्हाला १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४.५४ कोटी रूपये कशासाठी लागतात ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीस ८०२ किलोमीटर लांबीचा ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपुर्ण राज्यातील या महामार्गाचा १ किलोमीटरचा खर्च १०७ कोटी २३ लाख रूपये होता.

आता देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग माण- खटाव मार्गे वाढवून तो ८५६.९४ किलोमीटर म्हणजेच ५४.९४ किलोमीटर इतके अंतर वाढवून आता या महामार्गाचा खर्च १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवला आहे. याचाच अर्थ ५४.९४ किलोमीटर रस्त्यासाठी १४ हजार कोटी रूपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला. थोडक्यात माण -खटाव या माळरानावरून जाणा-या रस्त्याच्या १ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल २५४.५४ कोटी रूपये इतका खर्च केला जाणार आहे.

देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्ही १ किलोमीटर रस्त्यासाठी २५४.५४ कोटी रूपये खर्च करत आहात. नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॅालर रस्त्यावर टाकून महामार्ग बनविणार आहात काय ?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

तुमची भ्रष्ट्राचारी महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की या प्रकल्पातून ७० हजार कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहात. कारण हा सारा पैसा जनतेने व्याजासहित टोल रूपाने परत करायचा आहे, असेही शेट्टी यांनी या पत्रकामध्ये म्हटले आहे.

प्रकल्पाला विरोधकाम कायम

दरम्यान शक्तीपीठ मार्ग बदलला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात नव्या भागातून हा महामार्ग जात असलेल्या ठिकाणाहूनही शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या संदर्भात आजरा या तालुक्याच्या ठिकाणी राजू शेट्टी,सतेज पाटील, संपत देसाई आदींच्या उपस्थितीत या आठवड्यात मेळावा होणार आहे.