कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना नजर कैदेत ठेवून हजारोंच्या संख्येने पोलीस फौजफाट्यासहित गावाला घेरून जबरदस्तीने वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी बलपूर्वक जमीन मोजणी केली. शेतकरी जगदीश शेंबडे, शंकर शेंबडे,अनंत कुलकर्णी, राहुल मगर यांना कुटुंबासहित नजर कैदेत ठेवले, असा आरोप करून शक्तीपीठ विरोधी महामार्ग संघर्ष समितीच्या बुधवारी झालेल्या एका ऑनलाईन बैठकीवेळी या घटनेचा निषेध करण्यासाठी व पंढरपूर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजव्यापी आंदोलन चार टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा, सातारा आदी १३ जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते. आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, समन्वयक गिरीश फोंडे यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाची बांधणी केली जाणार आहे याकरिता दोन दिवसापूर्वी पंढरपूर भागात नांदोरे परिसरातील आव्हे,बाव्हे, सोळंकरवाडी या गावात जमीन मोजणीवेळी या प्रकल्पाला विरोध करीत शेतकरी, महिलांनी पेट्रोल ओतून घेऊन, खांबावर चढून, नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, पोलिस निरीक्षक योगेश लंगोटे व त्याचे पोलीस बल यांनी निर्दयी वागणूक दिली, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आमदार जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे शक्तिपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे दाखवून दिले आहे. तरी देखील निर्दयी सरकार दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने काढून घेत आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवून दडपशाहीने मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे तसे शेतकऱ्यांना घेऊन व्यूहरचना तयार करूया.
आमदार सतेज पाटील म्हणाले,सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी खर्च केली जाणारी एक लाख कोटीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी व जनतेसाठी द्यावी. शेतकऱ्यांनी लेखी हरकतींद्वारे विरोध दाखवला असताना देखील सरकार हे हुकुमशहासारखे वागत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व विभागातील जनतेचा उठाव सुरू आहे. ऊस आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी आंदोलन करत आहेत. कामगार आंदोलन करत आहेत. निवडणुका सुरू आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत सरकार पोलीस गुंड घुसवून गावामध्ये जबरदस्तीने मोजणी करत आहे. याला जशास तसे उत्तर देऊ. ऊस आंदोलनानंतर एकत्रित या जिल्ह्यांचा दौरा करू.
समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, संयुक्त मोजणी जबरदस्तीने केली म्हणजे जमीन मिळाली या भ्रमात सरकारने राहू नये. गाव व शेतकरी हे कायमस्वरूपी स्थायिक आहेत. सरकार बदलत असते. शेतकरी मोजण्यांसोबत महामार्गाचे साहित्य उधळून लावतील,महामार्ग कदापि होणार नाही.
पंढरपुरातील आव्हे गावातील जगदीश शेंबडे या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. पोलिसांनी गावाबाहेरचे सर्व महामार्ग बंदोबस्तात रोखले. गावकऱ्यांना अगोदरच्या रात्रीच नोटीस दिल्या,. आम्ही आत्महत्या करायला चालल्या नंतर पोलीस खुशाल आत्महत्या करा, आम्हाला फरक पडत नाही, असे म्हणत राहिले. आम्हाला घरात नजर कैदेत ठेवून मोजणी केली. आम्ही संयुक्त पंचनाम्यावर सह्या केलेल्या नाहीत.
यावेळ चार प्रमुख निर्णय घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात पंढरपुरातील अत्याचाराच्या विरोधात ९ ऑक्टोबर रोजी निवेदने देणे,आंदोलन करणे. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी कोल्हापुरात राज्यव्यापी प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवणे. सोलापुरातील सातत्यपूर्ण २२ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या मोजण्यांना राज्यभरातील इतर शेतकऱ्यांनी हजेरी लावणे. राज्यव्यापी सर्वपक्षीय व्यापक लढा उभा करणे.
यावेळी धनाजी गुरव, गजेंद्र येळकर, के. के. पाटील,ऋषिकेश देशमुख, सतीश घाटगे, माधुरी क्षीरसागर, गणेश घोडके, ओम पाटील, संदीप सावंत, रणजीत पाटील, दिगंबर कांबळे, संभाजी फरताडे, ओंकार पवार, नामदेव यादव, दीपक लाड, विक्रम पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. बैठकीला संदीप माटेगावकर, प्रकाश पाटील, संदीप निकम,कृष्णात पाटील, अनिल ब्याळे, शिवाजी कांबळे, राम मगर,कृष्णात साबळे, राहुल मगर यांच्यासोबत शेतकरी उपस्थित होते.
