सातारा : शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. येथे आमदारांना पक्षनेत्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायची पद्धत नाही असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा सांगितले.
मागील काही महिन्यात झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने मोठे यश मिळविले आहे. शिवसेनेचे एक नगराध्यक्ष, १५ जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सभापती, दोन उपसभापती झाले आहेत. हे सर्व सदस्य मोठ्या संघर्षातून भाजपा विरोधात लढून निवडून आलेले आहेत. या सर्व निवडून आलेल्या सदस्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी आणि त्यांचा पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार व्हावा या हेतूने साताऱ्यातील गांधी मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेतून कोणालाही शह देण्याचा या कोणाच्याही विरोधात ही सभा नाही असे स्पष्ट करून देसाई म्हणाले, शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. येथे आमदार, खासदार, माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष आणि माझी काही पदाधिकारी अशी कोणालाही निमंत्रण द्यायची पद्धत नाही. सर्वांनी स्वतःहून हजर राहायचे असते हा पक्ष शिस्तीचा एक भाग आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अंगापूर येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ते येत असल्याने त्यांच्याकडून साताऱ्यातील गांधी मैदानावरील सभेचा आणि सदस्यांच्या सत्काराचा विषय मांडल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आमदार महेश शिंदे यांचे सर्व फलकावर फोटो लागलेले आहेत. आता नव्याने काही पदाधिकारी झालेले आहेत. त्यांच्या फलकावर माझाही काही फोटो नाही. त्यामुळे आमदार शिंदे यांना डावलण्याचा कोणताही हेतू नाही. आमचे दोघांचेही संबंध चांगले आहेत. आणि आम्ही एकाच पक्षातले असल्याने आम्हाला सर्वांना पक्ष शिस्तीप्रमाणे काम करावे लागते असेही शंभूराज देसाईंनी सांगितले.
