सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीमध्येसुद्धा भाजपचे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले. पोलिसांनी केलेली अडवणूक, काढून घेतलेले मोबाइल या घटनेचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी निषेध करत मतदानावर बहिष्कार टाकला. या वादानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी, पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दहशतीच्या रणनीतीला चोख उत्तर देऊ. सभापती निवड म्हणजे राजकारणाची इतिश्री नव्हे. अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या’ असा सूचक इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात आली.

शंभूराज देसाई म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा कालावधी सभापती निवडीनंतर संपला असे नाही. कालावधी पाच वर्षांचा आहे. आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवतो. यापुढे आम्ही काय करू तुम्ही फक्त बघत राहा. ज्यांनी आमचे सदस्य फोडले त्यांच्यावरसुद्धा ही वेळ येऊ शकते.’

मंत्री मकरंद पाटील म्हणाले, ‘राजकारणामध्ये जय-पराजय होत असताे. आज आमचे सदस्य फोडले, तरी ही वेळ त्यांच्यावर येऊ शकते. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही. हे तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबात गेली ५० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे. आम्ही या प्रकरणाचे शंभर टक्के उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी जाताना राष्ट्रवादीच्या सदस्यांची पोलिसांनी चार-चार वेळा तपासणी केल्याने वादावादीचे प्रसंग घडले. त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले. सदस्य उशिरा सभागृहात पोहोचतील, याचा पोलिसांचा प्रयत्न पुन्हा दिसून आला. त्याचा निषेध राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दंडाला काळी फीत लावून केला आणि या दहशतीच्या राजकारणाचा निषेध करत, जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पायरीवर बसून धरणे आंदोलन केले. अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा लोकशाहीचा खून झाला, अशी कडवट टीका केली.