सोलापूर : सोलापूरसह मराठवाड्यातील बीड व लगतच्या दुष्काळग्रस्त भागाचा सर्वंकष पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांची भेट घेऊन दुष्काळ निवारणावर सविस्तर चर्चा करणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर केले. आगामी १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे एक विशेष शिष्टमंडळ पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील दुष्काळाची भीषणता मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या तुळशी गावाला रविवारी (दि. १) भेट देऊन पवार यांनी थेट बांधावर जात पाहणी केली. शेतकरी सखाराम चव्हाण यांच्या जळालेल्या उसाच्या फडाची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. यावेळी तुळशी गावातील संकट निवारणासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयांच्या विकासकामांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. हा केवळ शासकीय सोपस्कार न राहता या निधीतून गावात टँकरमुक्तीसाठी जलसंधारणाची कायमस्वरूपी कामे, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय युद्धपातळीवर मार्गी लावावी, अशा स्पष्ट सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या.

सोलापूरमधील दाहक परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने तीन दिवसांचे विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलावून ठोस मदत जाहीर करावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. १९७२ च्या मोठ्या दुष्काळाची आठवण करून देत शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत, शेतमजुरांना जगण्यासाठी थेट अनुदान, पीककर्ज व वीज बिल माफी आणि चाऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था यावर सरकारने सणासुदीपूर्वीच निर्णय घ्यावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह इतर भागाचा दौरा आटोपल्यानंतर सर्वंकष परिस्थितीचा अहवाल सोबत घेऊन आपण स्वतः दिल्ली आणि मुंबईत सर्वोच्च पातळीवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार राजू खरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘तुळशी’चे अनोखे आंदोलन आणि शिरपूर पॅटर्न

पिण्याच्या पाण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी “गाव विकणे आहे, किंमत पाणी” असा अनोखा व टोकदार फलक लावून तुळशी गावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. सलग तीन आठवडे चाललेल्या या जनआंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गावात येऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दुसरीकडे, राज्यात सर्वपक्षीय विरोध होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी अधिकाऱ्यांचे तुळशीकरांनी स्वागत आणि मोजणी यंत्रांची पूजा करून भूसंपादनाला सहकार्य करत आंदोलनकर्त्या नेत्यांना मोठा धक्का दिला होता. सध्या याच गावात आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ‘विश्वमंगल फाउंडेशन’ व ग्रामस्थांच्या सहकार्यातून जलपुनर्भरणाचा प्रसिद्ध ‘शिरपूर पॅटर्न’ वेगाने राबवला जात असून मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरण व बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत.

पवारांसमोरच आमदार अभिजित पाटलांची जीभ घसरली…

दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच उपस्थितीत बोलताना माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांची जीभ घसरली. दुष्काळ निवारणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टिका करताना, “शरद पवारांनी जर सांगितले तर सरकारला झक मारत दुष्काळाच्या उपाययोजना कराव्याच लागतील, पवारांच्या सूचनांची दखल सरकारला गांभीर्याने घ्यावीच लागेल,” असे वक्तव्य केले. व्यासपीठावर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना, त्यांनी वापरलेल्या शब्दांमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.