सातारा : रणरणत्या उन्हात अवजड कावडी खांद्यावर घेत ‘म्हाद्या धाव… म्हाद्या पाव… हर हर महादेव!’ असा जयघोष करत शिवभक्तांनी अवघड मुंगी घाट सर करत शिखर शिंगणापूर यात्रेची भक्तिभावात सांगता केली. कावडीत आणलेल्या पवित्र जलाच्या शिवलिंगावरील जलाभिषेकावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

मुंगी घाटातील चित्तथरारक चढाई पाहण्यासाठी लाखो भाविकांनी डोंगररांगांवर गर्दी केली होती.

शिखर शिंगणापूर येथील महादेवाची कावड यात्रा गुढी उभारून सुरू झाली होती. हळदीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर ध्वज बांधण्यात आले. एकादशी दिवशी इंदूर येथील काळगावडे राजे यांनी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुंगी घाटातून कावडी चढवण्यास सुरुवात झाली.

सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेतील अखेरच्या टप्प्यातील हा उंच डोंगर आणि त्यातील मुंगी घाट अतिशय अवघड मानला जातो. खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ आदी भागांतून मोठ्या प्रमाणात कावडी दाखल झाल्या. निवृत्ती महाराज खळदकर, काशीनाथ कावडे आणि संत तेली भुतोजी बुवा यांच्या मानाच्या कावडी या यात्रेचे नेहमीप्रमाणे विशेष आकर्षण ठरल्या.

यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजित सावंत, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी, माण पंचायत समिती सदस्य राजाराम बोराटे, ग्रामपंचायत सरपंच/प्रशासक कावेरी खंदारे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक आणि कावडीधारक उपस्थित होते.

दुपारच्या रणरणत्या उन्हातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कड्याकपारीत पाय रोवत, मानवी साखळी तयार करत आणि दोरखंडाच्या साहाय्याने कावडी अवघड असलेल्या मुंगी घाटातून वर चढवण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हा थरार सुरू होता. अखेर रात्री उशिरा सर्व मानाच्या कावडी मुंगी घाट सर करून मंदिरात दाखल झाल्या.

कावड मिरवणुकीत ढोल-ताशे, सनई, हलगी यांच्या गजरात भक्त तल्लीन होऊन नाचत होते. निरा नदीसह पंचनद्यांच्या पाण्याने शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. मानाच्या कावडींचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. या कावडींनी शंभू महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर यात्रेची सांगता झाली. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वाहतूक, तसेच इतर बाबींचे केलेले अचूक नियोजन हे यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण राहिले.

तेल्याभुत्याची कावड यात्रेचे खास आकर्षण !

शिखर शिंगणापूर यात्रेत मानाचे स्थान असलेली संत तेली भुतोजी बुवा यांची कावड ही यंदाही प्रमुख आकर्षण ठरली. मुंगी घाटातील त्यांच्या कावडीचा थरार पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.