सातारा : ठेकेदारीतून केलेल्या कामाचा ताबा घेण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना महिला सरपंचांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या लाच प्रक्रियेत सरपंचांचे शिक्षक असलेल्या पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकुर्डे खुर्द (तालका शिराळा) येथील संत रोहिदास नगर येथे अनुसूचित जाती व जमाती नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाच्या देखरेख व प्रशासकीय कामकाजासाठी मक्तेदार यांचेकडून तक्रारदारास अधिकार पत्र देण्यात आले होते.
काम पूर्ण झाले असून सदर कामाचे अनुदानाचा पहिला हप्ता मक्तेदार यांना प्राप्त झाला असून उर्वरित हप्ता मिळणे करिता तक्रारदार यांना सदर काम ग्रामपंचायतीला हस्तांतरित केल्याची पावती आवश्यक होती. तसेच या कामाचे संदर्भातील विमा, उपकर, आयकर, टेंडर प्रमाणे, सीजीएसटी व एसजीएसटी अशा शासन कपाती शासनास जमा होणे आवश्यक होते.
पूर्ण झालेल्या कामाची ताबा पावतीवर सरपंच व ग्रामसेवक यांची सही आवश्यक असून तक्रारदार यांना ती पावती देणे करिता तसेच कामाची शासन कपाती शासनास जमा करणे करिता महिला सरपंच शितल पाटील व त्यांचे पती बाळासाहेब पाटील यांनी सदर कामाचे एकूण मंजूर अनुदान रकमेच्या ७ टक्के रक्कम लाच मागितली होती . याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता.
या तक्रारीनुसार पडताळणी केली असता ५० हजार रुपये व तडजोडीअंती ३५ हजार रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. सरपंच श्रीमती पाटील व पती श्री पाटील हे दोघे शिराळा तहसील कार्यालयासमोर असलेल्या हॉटेल दौलतचे पोर्चमध्ये लाच रक्कम स्वीकारण्यास आले.
यावेळी पथकाने सरपंच पाटील यांना ३५ हजार रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पती पाटील हे जाधववाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. दोघांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप अधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
