कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी, या मागणीसाठी शिरोळमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. या औद्योगिक वसाहतीसाठी पाठपुरावा करणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समोरील प्रकल्प साकारण्याचे आव्हान आणखी कठीण बनले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, माजी सैनिक आणि महिलांनी शिरोळ प्रशासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.
या आंदोलनाला सुरुवातीपासूनच आक्रमक वळण लागले असून संतप्त आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाचे लोखंडी मुख्य दरवाजा तोडून टाकला. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या काचांची तोडफोड केली, दरवाजा तोडत असताना तो अंगावर पडल्याने एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून कार्यालय परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.टाकळी गावाची ब्रिटिश काळापासून सैनिकी परंपरा असून प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यात आहे. आतापर्यंत गावाने तब्बल १८ भूमिपुत्र देशासाठी अर्पण केले आहेत, तसेच दीड हजाराहून अधिक सैनिक या गावाने घडवले आहेत.
अशा सैनिक टाकळी गावातील गट क्रमांक १३५० आणि ११९४ सह एकूण ४७ एकर गायरान जमिनीवर एमआयडीसी उभारण्याचा घाट विभागाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घातला आहे. या प्रकल्पामुळे शेतजमीन नापीक होईल, उपजीविका धोक्यात येईल, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. महापुराच्या वेळी छावणीसाठी वापरली जाणारी हीच जागा बुडेल आणि गावात सैनिकांऐवजी परप्रांतीय कामगार, व्यसनाधीनता आणि प्रदूषण वाढेल असा आरोप करत ग्रामस्थांनी २०२३ पासून आंदोलन अंकुश संघटनेच्या माध्यमातून विरोध सुरू केला आहे.
या आधी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, भजन आंदोलन केले होते. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 18 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेऊन ही प्रक्रिया स्थगित ठेवून जैसे थे स्थिती ठेवण्याचे आणि ग्रामसभा ठरावाची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या पथकाने नुकतीच गायरान जमिनीची संयुक्त पाहणी केली होती.
मात्र तरीही ठोसपणे प्रकल्प रद्दचा निर्णय न झाल्याने आज आंदोलक मोठ्या संख्येने शिरोळ तहसील कार्यालयावर धडकले. त्यांच्यासमवेत शेतकऱ्यांचे, मेंढपाळांचे प्रतीक म्हणून शेळ्या- मेंढ्या होत्या. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांशी वादावादी केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन अधिक चिडले. विशेष म्हणजे आंदोलन सुरू असताना तहसीलदार कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आल्याने आंदोलक अधिक संतप्त झाले. त्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि ही एमआयडीसी कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी यावेळी राकेश जगदाळे, दीपक पाटील यांच्यासह आंदोलकांकडून करण्यात आली. या घटनेमुळे शिरोळ प्रशासकीय कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
