कोल्हापूर : नृसिंहवाडी येथे दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कन्यागत महापर्व २०२८ च्या अनुषंगाने प्रत्येक विभागानुसार सुमारे २०० कोटींचा विकास कामांचा प्रस्ताव तयार केला आहे. दुसरीकडे, चुकीच्या कर कारणीमुळे शिरोळ नगरपालिकेला नागरी सुविधा पुरवणे कठीण बनले असल्याने विशिष्ट नागरिक सेवा, सुविधा पुरवण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा, आदी विषय शुक्रवारी पालिका सभेत मंजुर करण्यात आले.
शिरोळ पालिका हद्दीतील गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आले असून घनकचरा प्रकल्प सुरू करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.
शिरोळ नगरपालिकेच्या कै. दिनकररावजी यादव सभागृहात आज मासिक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता कांबळे होत्या. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषय सभेचे वाचन केले. सभेत विषयवार सविस्तर माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी दिली.
यादव म्हणाले, शिरोळ शहरात चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झाल्यामुळे कर भरणा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी वेगळ्या निधीची गरज आहे. त्यासाठी शासनाला वीस कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत व केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनेतून कल्लेश्वर तलाव येथे सुशोभीकरण करणे व इतर विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव करण्यात येणार आहे. कन्यागत महापर्वकाळ सोहळा २०२८ च्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागाशी समन्वय साधून शहरातील विकास कामांचा सुमारे २०० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी देण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन केंद्र चालू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शहरात एकूण ३६ अंगणवाडी आहेत. यातील काही भाडे तत्त्वावर आहेत तर काही इमारतींची दुरावस्था झाली आहे. या सर्व अंगणवाडी इमारतींचा सर्वे करून नादुरुस्त इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमासाठी पाणी टँकरची गरज आहे. यासाठी दोन हजार लिटरच्या दोन स्टील पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेकडील जुनी खराब घंटागाडी, ट्रॅक्टर व मैल टँकर यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
घालवाड येथील जॅकवेल मधील गाळ काढण्याचा निर्णय पावसाळ्यानंतरद घेण्याचे ठरले. तसेच बांधकाम परवाना येताना अडचणी येत असल्यामुळे सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विषय सभेवरील सर्वच विषयावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यावेळी दीपक भाट यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा पगार देण्याबाबत सूचना केली. विजय आरगे यांनी दैनंदिन खर्चाची बिले त्वरित अदा करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी यावेळी नगरसेवक विजय आरगे, शरद मोरे , दिपक भाट, ओंकार गावडे, उल्हास आवळे, राहूल कोळी, शाहूल कोळी, अमरसिंह पाटील, अमर शिंदे, सचिन शिंदे, निलेश गावडे, विदुला यादव, सविता पुजारी, रेखा कोरे , कल्पना काळे, अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, अनुराधा गुरव, दिपाली फल्ले, श्वेता जाधव, शिवानी कांबळे नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अभिनंदनाचा ठराव
प्रादेशिक पर्यटन मधून कल्लेश्वर तलावासाठी ५१ लाख निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्रालयामार्फत राज्यस्तरावर व संवर्धन योजनेतील ४ कोटीचा निधी मंजुरी दिल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यानसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनचा ठराव मासिक सभेत करण्यात आला.
