दयानंद लिपारे

कोल्हापूर : सामान्य मराठा मावळय़ाला उमेदवारी देत शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत थेट कोल्हापूरच्या ‘छत्रपतीं’च्या राजनीतीला शह दिला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले संभाजीराजे छत्रपती हे शिवबंधन बांधण्यास तयार नसल्याचे दिसून आल्यावर शिवसेनेने चाणाक्षपणे व्यूहरचना करीत संजय पवारसारख्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देत प्रादेशिक, जातीची सारीच गणिते आपल्या बाजूला केल्याचे दिसत आहे.

संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ३ मे रोजी संपली. तेव्हापासून त्यांनी राजकारण करणार नाही असे म्हणत राजकीय डावपेच सुरू ठेवले. नवी राजकीय भूमिका मांडू असा पवित्रा घेत त्यांनी पुणे येथे स्वराज्य संघटनेची स्थापना करून कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले. येथूनच त्यांनी स्वत:भोवतीच चक्रव्यूह आखला नी ते त्यातच गुंतून पडले.

भाजपशी नाते तुटले

 भाजपच्या मदतीने राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतरही त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यापासून दोन हात दूर राहणे पसंत केले. राज्य तर दूरच, पण ‘कमळ’ फुलवण्यासाठी त्यांनी कधी कोल्हापुरातही पक्षाला मदत केली नाही. यामुळे भाजप अंतर्गतही त्यांच्यावर छुपी नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे भाजपने संभाजीराजांना पाठिंबा देण्याबाबत शेवटपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली.

 ‘मविआ’तही मतैक्याचा अभाव

 भाजपकडून यंदा प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आलेल्या संभाजीराजेंनी यंदा सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीशी जुळवून घेण्याची पावले टाकण्यास सुरुवात केलेली होती. परंतु इथेही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादीने ही जागा शिवसेनेची असल्याचे सांगत त्यांच्या गोटात चेंडू ढकलला. शिवसेनेने संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्याचा आग्रह धरीत सहाव्या जागेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली. मात्र याबाबत स्पष्ट भूमिका घेण्यात चालढकल करत आपण अपक्ष लढू अशी भूमिका संभाजीराजेंनी कायम ठेवली. पक्षप्रवेश न करता पद मिळवण्याची त्यांची ही चाल लक्षात घेऊन शिवसेनेने छत्रपतींना बाजूला करत पक्षाचे निष्ठावान संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पवार यांच्या या निवडीतून शिवसेनेने एकप्रकारे राजघराण्यापेक्षा सामान्य मावळय़ाला महत्त्व देत असल्याचा संदेश दिला आहे. शिवाय, पवार कोल्हापुरातीलच आहेत, मराठा जातीतील असल्याने या दोन मुद्दय़ांवरूनही राजकारण करण्याची संधी शिवसेनेने विरोधकांना ठेवलेली नाही.