दयानंद लिपारे

कोल्हापूर : शिवसेनेचे कोल्हापूरमध्ये तीन खासदार. दोन लोकसभेत.  एक राज्यसभेत लवकरच प्रवेश करण्याच्या मार्गावर.  शिवसेनेचा दिल्लीचा राजमार्ग असा प्रशस्त होत असताना मुंबईकडे जाणारा रस्ता मात्र आकुंचन पावत असल्याची चिंताही पक्षात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक झाली तर पूर्वी सहापैकी एका आमदारास उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे इतरांना आपले भवितव्य काय याची चिंता लागली आहे.

Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
Withdrawal of Dr Chetan Narke from Kolhapur Lok Sabha Constituency
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. चेतन नरके यांची माघार; पाठिंब्याचा निर्णय गुलदस्त्यात
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर राज्याच्या राजकीय पटलावर विशेष चर्चेत आले आहे. राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली. त्यांना महा विकास आघाडी वा शिवसेनेची उमेदवारी मिळणार असे चित्र होते. शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे उमेदवारी कोणालाही यावरून गेला आठवडाभर घोंगावत असणारे वादळ शांत झाले आहे. शिवसेना, महा विकास आघाडीतील मित्रपक्ष, अपक्ष या आमदारांची गोळाबेरीज करता शिवसेना सहावा उमेदवार म्हणून पवार यांना निवडून आणू शकते, असा दावा केला जात आहे. तसे चित्र असल्याने शिवसेनेचा कोल्हापूरचा तिसरा खासदार संसदेत जाण्याचा मार्ग जवळपास सुकर झाल्यासारखे आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले की एक खंत कायम बोलून दाखवत असत. ‘मला कोल्हापूरचा शिवसेनेचा खासदार झाल्याचे पाहायचे आहे,’ ही त्यांची अंतरीची तगमग ते अनेक वर्षे, अनेक लोकसभा निवडणुकांत वारंवार, जाहीररीत्या बोलून दाखवत असत. त्यांच्या हयातीत हे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. तथापि गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक (कोल्हापूर) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) असे दोन्ही खासदार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी सेनेचे उरीचे शल्य पूर्ण ‘करून दाखवले’. तर आता तीन वर्षांनंतर संजय पवार यांच्या रूपाने कोल्हापूरला शिवसेनेला संसद गाठण्याची आणखी एक संधी प्राप्त झाली आहे. सामान्य शिवसैनिकास थेट नवी दिल्लीस पाठवण्याची किमया शिवसेना करू शकते याचा पुन्हा एकदा दाखला मिळाला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वारे आहे.

मात्र याच वेळी विविध मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधित्व निभावलेल्यांमध्ये मात्र चिंता दाटलेली आहे. आगामी निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे सूतोवाच केले जात आहे. सत्ताकारणाचे हेच सूत्र कायम राहिले तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपले राजकीय भवितव्य काय या चिंतेने माजी आमदारांना जखडून टाकले आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकाच वेळी सहा आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आले होते. शिवसेनेची ताकद लक्षणीय प्रमाणात वाढल्याचा हा एक दाखला. आता हे चित्र बदलले आहे. गेल्या वेळी राधानगरीचे प्रकाश आबिटकर वगळता उर्वरित पाच आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापुढे आघाडीने एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय पाच आमदारांना अडचणीचा ठरू शकतो. नवी दिल्लीचा रस्ता शिवसेनेसाठी प्रशस्त होत असताना मुंबईचा मार्ग निमुळता होत जाण्याची चिन्हे आहेत. एकीकडे संसदेतील बळ वाढत असताना भविष्यात विधानसभेतील ताकद पूर्वीच्या तुलनेत कितपत असणार, हा प्रश्न आहे. याची चिंता पाच माजी आमदारांना आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुका कोणत्या मार्गाने लढायच्या याचा निर्णय शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्णय अंतिम होईल तेव्हा याबाबतचा विचार करावा लागेल. तथापि, लोकसंपर्क, विकासकामे या माध्यमातून आम्ही जनतेसमोर पूर्वी इतक्याच जोमाने जात आहोत. आमचा जनसंपर्क मुळीच कमी झालेला नाही. कधीही निवडणूक लागली तरी तिला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. अंतिम निर्णय सेनाप्रमुख घेतील.

– डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना माजी आमदार