कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले आहे. बदललेल्या मार्गावरही शेतकऱ्यांचा विरोध होत असून शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्याचे समर्थन केले आहे. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेने शक्तिपीठ बाबत मेळावा घेऊन या प्रकल्पाला विरोध केला.
शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच हजारो शेतकरी देशोधडीला लागणार आहे. हा प्रकल्प बड्या भांडवलदारांच्या हितासाठी राबवला जात असून त्यात सामान्यांचा काहीच फायदा होणार नाही. या प्रकल्पाबाबत पालकमंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी भूमिका जाहीर करावी. अन्यथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा येथे शक्तीपीठ विरोधातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात देण्यात आला.
यावेळी रवीकिरण इंगवले, संजय चौगुले, सुनील शिंत्रे, नामदेव गिरी या जिल्हाप्रमुखांसह शहर प्रमुख सुनील मोदी, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, महिला संघटिका रीमा देशपांडे, प्रतिज्ञा उत्तुरे, संभाजी भोकरे, शहर प्रमुख विशाल देवकुळे, दीपक गौड, प्रकाश पाटील यांची भाषणे झाली. त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध विरोध करीत प्रकल्पाविरोधात ताकतीने लढा देण्याचा निर्धार केला.
विरोध कशासाठी?
त्यांनी सांगितले की, हा महामार्ग सुपीक बागायती जमिनीतून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. महामार्गाचे संरेखन बदलण्यापेक्षा तो पूर्णपणे रद्द करण्यात यावा.
बदललेल्या रेखांकनाची अधिसूचना ही ५ मे रोजी जाहीर झाली आहे. यामध्ये कोल्हापुरातील ७८ गावे बाधित होत आहेत. ही अधिसूचना जाहीर होतात या रेखांकनाच्या बाधित गावांमध्ये प्रचंड असंतोष शेतकऱ्यांमध्ये पसरला आहे. गावागावात शेतकऱ्यांच्या निषेध सभा सुरू झाल्या आहेत. नवीन रेखांकनानुसार रस्ता झाल्यास महापुराचे संकट उडवणार आहे. ६ हजार एकर शेती बाधित होऊन साखर कारखान्याच्या ऊस गाळपावर याचा परिणाम होणार आहे. जंगली प्राण्यांनी तसत असलेल्या गावांमध्ये हा त्रास जास्त वाढणार आहे. पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला निसर्ग आणि शेतकऱ्यांचा गळा घोटणारा प्रकल्प संबोधले आहे आणि तो रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.
मेळाव्यातील ठराव याप्रमाणे १) शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा, पर्यावरणाची हानी करणारा महामार्ग रद्द करावा. २) धार्मिक भावनांना हात घालत राज्य शासनाने चालवलेली कोट्यावधी रुपयांची उधळण थांबवावी. या प्रकल्पामुळे महापुराच्या तीव्रतेत वाढ होणार असल्याने प्रकल्प रद्द करावा. ३) शेतकऱ्यांना पाचपट रक्कम देण्याच्या भूलतापा देऊन जमीन संपादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प शेतकऱ्यांना कंगाल करणारा असल्याने तो रद्द करावा. ४) गोवा, रत्नागिरी भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने या प्रकल्पाची गरज नसल्याने तो रद्द करावा.
