कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी रविवारी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांची सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. कुलगुरूंच्या या अचानक भेटीमुळे ९२ वर्षांचा हा साहित्यिक भारावून गेला. नलगे यांनी वयाच्या नव्वदीत शंभरावे पुस्तक लिहून हातावेगळे केले होते. १०१ कादंबऱ्या, असंख्य कथा, ललित लेखन, हजारो विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात शिक्षण संस्था उभारणारा समाजधुरीण असणारे नलगे आयुष्यभर साहित्य सेवा करीत आले आहेत.

कुलगुरु डॉ. कामत यांनी नलगे यांची त्यांच्या कोतोली मार्गावरील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान नलगे आणि डॉ. कामत यांच्यात मनमोकळा संवाद झाला. नलगे यांच्या साहित्यिक योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक योगदानाबद्दल कुलगुरू डॉ. कामत यांनी कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिका या योजनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच अन्य जुन्या आठवणींविषयी बोलताना नलगे यांना गहिवरुन आले.

विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपण इतक्या आस्थेने विचारपूस करण्यासाठी आलात, असे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी आपली काही निवडक पुस्तके कुलगुरूंना भेट दिली. यावेळी प्रदीप नलगे, अनिता नलगे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

सारस्वतात मौलिक योगदान

कथा, कादंबरी, कविता, ललितगद्य, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, संशोधननपर लेख, चरित्रात्मक लेखन अशी चौफेर वाङ्मयनिर्मिती प्रा. नलगे यांनी केली आहे. प्रा. चंद्रकुमार नलगेंनी एकूण १७ कथासंग्रह लिहून मराठी कथावाङ्मयात मोलाची भर घालून मराठी कथेचे दालन समृद्ध केलेले आहे. अर्थात ही समृद्धता केवळ संख्यात्मक नसून ती वास्तवतापूर्ण, कलात्मक तसेच अर्थात्मकदृष्ट्या सुद्धा आहे.

त्यांनी आपल्या कथासंग्रहातून कोल्हापूर – सातार्‍याच्या डोंगरी मुलखातून वाहणार्‍या विशाल अशा वारणाखोरे व कानसा खोरे येथील समाज जीवनातील कुटुंबसंस्था, श्रद्धा, अंधश्रद्धा, लग्नपद्धती, रुढी- परंपरा, माणसांच्या मनातील समज -अपसमजातून निर्माण होणार्‍या समस्या, त्यातून हृदय पिळवटून निघणारी भावनिकता, ग्रामीण कृषी संस्कृतीतून निर्माण होणारी विलक्षण मानसिक घालमेल व संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण केलेले आहे.

पुरस्काराचे मानकरी

प्रा. नलगे यांनी नववीत असताना ‘गळफास’ नावाची एकांकिका लिहिली. विद्यार्थिदशेतल्या या हस्तलिखित एकांकिकेला राज्य शासनाच्या वाङ्मयपुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आजवरच्या वाङ्मयीन कामगिरीचा गौरव म्हणून गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं त्यांचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारा’नं सन्मान केला. भेडसगाव हे नलगे यांचं गाव. पुढं बिळाशी, शिराळा, कोल्हापूर, उजळाईवाडी ते केर्ली असा त्यांचा जीवनप्रवास झाला. शेतकरी-शेतमजूर कुटुंबात जन्मलेले नलगे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं.

नलगे यांच्या वाङ्मयसंवेदनशीलतेची दोन मुख्य केंद्रं आहेत. पहिलं केंद्र म्हणजे त्यांनी पाहिलेला-अनुभवलेला भूतकाळ. हा त्यांच्या बालपणाशी आणि तरुणपणाशी निगडित होता. वारणा खोरं आणि तिथला समृद्ध निसर्ग…या परिसराची, गावगाड्याची, माणसांची, त्यांच्या श्रद्धांची भावचित्रं नलगे यांनी मनःपूर्वक रेखाटली. वारणापरिसरावर त्यांचं निरतिशय प्रेम आहे, त्यामुळे या परिसराला त्यांनी पुनःपुन्हा साद घातली. त्यांच्या ललित वाङ्मयात या परिसराची स्मरणरमणीयता आहे.