scorecardresearch

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून हटवा – शिवसेनेची मागणी

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकाला टोळीयुद्धाचे स्वरूप आल्याची टीका

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून हटवा – शिवसेनेची मागणी

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकाला टोळीयुद्धाचे स्वरूप आल्याची टीका करून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याचे समर्थन करतात, असा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी कोल्हापुरात केला. निवडणूक संपेपर्यंत चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची मागणी आपण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीत पैसे वाटण्याच्या कारणावरून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप–ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्याशिवाय दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांचे कार्यालय फोडण्याबरोबरच गाडय़ांचीही तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ताराराणी आघाडीतील अनेक उमेदवारांचे अवैध धंदे आहेत. अनेक उमेदवार पॅरोलवर बाहेर सुटलेले आहेत. अशा उमेदवारांमुळे या निवडणुकीला टोळी युद्धाचे स्वरुप आले आहे. त्यातून सोमवारी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पालकमंत्री चंद्रकात पाटील यावर कारवाई करण्याऐवजी निवडणुकीत हाणामारी होतेच, असे सांगत एकप्रकारे त्याचे समर्थनच करताहेत. मंत्री म्हणून जबाबादारीने काम करण्याऐवजी ते चुकीचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळेच निवडणूक पूर्ण होईपर्यंत त्यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. आजच कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली जाईल.
कोल्हापूरात सोमवारी घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा आणि मतदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर न्यूज ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena demanded removal of chandrakant patil from guardian minister position

ताज्या बातम्या