कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव, प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. त्या ५३ वर्षांच्या होत्या.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्या नात, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या होत्या. संस्थेमध्ये २००८ पासून सलग १८ वर्षे सचिव म्हणून काम पाहताना त्यांनी डॉ. बापूजी साळुंख यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळला. संस्थेच्या सुमारे ४१० संस्कार केंद्रात त्यांनी नवनवीन योजना संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविल्या.

इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आर्टिफिशीयल इंटिलिजन्स, लॉ कॉलेज या शाखांचा शुभारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवल्या. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य,नृत्य, नाटय्, कला, संगीत, इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, जर्मन भाषांच्या विकासासाठी महत्त्पूर्ण योगदान दिले. त्यांच्या मागे पुत्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या सह मोठा परिवार आहे.