सांगली : भारतीय सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना व क्रीडा सेनेच्यावतीने ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून दिल्लीमध्ये सिंदूर आर्मी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात रक्तदान करण्यासाठी जाणार्‍या युवकांसाठी उद्या दि. ६ ऑगस्ट रोजी सांगली स्थानकातून श्रीनाथ एक्सप्रेस रवाना होणार असल्याची माहिती महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
दिल्लीत होणार्‍या सिंदूर महारक्तदान शिबीरासाठी सांगली जिल्ह्यातील बाराशे ते दीड हजार तरूण दिीला जाणार आहेत.

या रक्तदात्या तरूणांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली स्थानकावरून ही रेल्वे उद्या सायंकाळी रवाना होणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सांमत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती पैलवान पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले, गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये १५०० हून अधिक पैलवान आणि शिवसैनिकांनी रक्तदान करून नवा आदर्श निर्माण केला होता. त्याच धर्तीवर यंदा दिल्लीतील लष्करांच्या रूग्णालयात रक्तदानाचा उपक्रम होणार आहे.

दिल्लीत दि.९ रोजी होणार्‍या रक्तदान शिबीरास देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे १३ खासदार उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उपक्रमामुळे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा संदेश दिला जाणार असल्याचे पैलवान पाटील यांनी सांगितले.