कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी एकाच वेळी करोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे सर्वजण मुंबईहून आलेले इथले स्थानिक नागरिक आहेत. मुंबईहून आलेल्या या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करोना रुग्णांची स्थिती आत्तापर्यंत नियंत्रणात होती. जे रुग्ण आढळून आले आहेत ते जिल्ह्याबाहेरुन आलेले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोल्हापुरात करोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे.

आज (शनिवार) सहा जणांचा करोना संसर्गाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, हे सर्वजण मुंबई येथून आलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये राधानगरी येथील २३ वर्षांचा तरुण, कागल तालुक्यातील सोनगे येथील ४५ वर्षांची महिला, जयसिंगपूर येथील १८ आणि २० वर्षांचे तरुण, गडहिंग्लज येथील ५७ वर्षाचा आणि भुदरगड येथील एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली आहे.