सोलापूर: सोलापूरची विमानसेवा पुन्हा सुरू होणे आणि नियोजित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भविष्यात सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी उपलब्ध होतील. वाहतूक अन् पायाभूत सुविधांमुळे येथील उद्योगांच्या विस्ताराला गती मिळेल, असा विश्वास सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एसआयए) अध्यक्ष डी. राम रेड्डी यांनी व्यक्त केला. सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चिंचोळी एमआयडीसी येथील जयकुमार पाटील उद्योग भवन येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. रेड्डी म्हणाले, “असोसिएशनच्या जागेत सभासद व त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा सुविधा, क्लब हाऊस, रेस्टॉरंट तसेच व्यावसायिक कामानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांच्या निवासासाठी ८ ते १० खोल्यांसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.” या प्रस्तावास उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. याशिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात असोसिएशनमार्फत विविध पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत समस्यांवर प्रशासनाकडे पाठपुरावा
चिंचोळी एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठा व सातत्याने होणाऱ्या ट्रिपिंगच्या समस्या, बंद पथदिवे तसेच औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत असोसिएशनमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. तसेच, एमआयडीसीकडून उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन सेवांची उद्योजकांना माहिती मिळावी आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी लवकरच विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य; नवा ठराव मंजूर
संस्थेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी सभेत महत्त्वाचे घटनात्मक ठराव मंजूर करण्यात आले. कार्यकारी समितीच्या सदस्यांनी पदावर कायम राहण्यासाठी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समितीच्या बैठकांमध्ये किमान ५० टक्के उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही अट पूर्ण न करणारे सदस्य आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र ठरतील, असा ठराव संमत झाला. याशिवाय एकूण प्रिन्सिपल सभासदांच्या तुलनेत असोसिएट सभासदांचे प्रमाण कमाल १० टक्के ठेवण्याचा आणि सेकंडरी सभासदांच्या पात्रतेबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला.
नवीन सभासदांचे स्वागत आणि वार्षिक हिशोब सादर
सभेच्या सुरवातीला १७ नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड, उपअभियंता प्रदीप खंदारे, अग्निशामक उपअधिकारी रमेश शिंदे आणि कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती माशाळ यांचेही स्वागत झाले. सचिव वासुदेव बंग यांनी प्रास्ताविकातून वर्षभरातील कामांचा आढावा घेतला. खजिनदार सप्रेम कोठारी यांनी वार्षिक हिशोब सादर केला. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी असोसिएशनचे लेखापाल (सीए) म्हणून धनराज नोगजा यांची नियुक्ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली.
सभेत टाटा पॉवर सोलरतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प आणि एज बिझनेस सोल्युशन्सतर्फे त्यांच्या सेवांबाबत सादरीकरण करण्यात आले. या सभेस उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, सहसचिव अभिषेक तापडिया, शिवशंकर आंधळकर, माजी अध्यक्ष व कार्यकारी सदस्य शरदकृष्ण ठाकरे, सिद्धाराम चिट्टे, कमलेश शहा, रामेश्वरी गायकवाड, तारासिंग राठोड, जयपाल महिंद्रकर, विक्रम बंडेवार यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड यांनी, तर आभार प्रदर्शन सहसचिव शिवशंकर आंधळकर यांनी केले.
