सोलापूर : सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या विमानसेवा, उड्डाणपूल आणि माहिती तंत्रज्ञान उद्यान (आयटी पार्क) या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शुक्रवारी (दि.७) मंत्रालयात बैठकीत निर्णय घेण्यात आले असून, संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
विधानभवन येथे सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित दोन उड्डाणपुलांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यास ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, रेल्वे, बीएसएनएल आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीनंतर बैठकीत झालेल्या चर्चाबाबत एक चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. सोलापूरच्या उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या जमिनी संदर्भातील तांत्रिक अडचणी आणि वाद संपुष्टात आले आहेत. शासकीय जमीन मोफत देण्यासंदर्भातील प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच, टपाल आणि रेल्वे खात्याच्या जागेचा मोबदला विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाचा आदेश देऊन उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होईल, असे गोरे यांनी सांगितले.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार कोठे यांनी शहरातील काही प्रलंबित विकासकामांबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार, ही बैठक झाल्याचे, पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरची विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. सद्यस्थितीत बंद असलेल्या विमानसेवेवरून संबंधित विमान वाहतूक कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दृश्यमानता योग्य असेल तर विमानसेवा सुरू राहिली पाहिजे, असा निर्णय घेत रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठीच्या (नाईट लँडिंग) अतिक्रमणांचा प्रश्नही मार्गी लावण्यात येत आहे. याशिवाय, बोरामणी विमानतळाच्या उभारणीबाबत बैठकीत चर्चा झाली.
माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी प्रशासनाने जलसंपदा विभागाची जागा सुचवली होती. ही जागा जलसंपदा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुढील सात दिवसांत हस्तांतरित करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे या आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न सुटला आहे.
या प्रकल्पांसोबतच सोलापूरच्या अंतर्गत जलवाहिनीच्या कामासाठी जागतिक बँक आणि राज्य शासनाचा वाटा निश्चित करण्यात आला असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच, शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत २५ विद्युत बस (ई-बस) सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
‘आयटी पार्क’च्या मुद्यावर शीतयुद्ध
मागील महिन्यांत सोलापूरच्या दाैऱ्यावर असताना, उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रस्तावित होटगी येथील जलसंपदा विभागाची जागा शहरापासून दूर असल्याचा मुद्दा उपस्थित करीत आयटी पार्क शहरात असावे, अशी भूमिका मांडली होती. येत्या १० जुलैला पुन्हा सोलापुरात येणार असून, त्यावेळी शहरातील जागा निश्चितीबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
तर, पालकमंत्री जयकुमार गोरे व भाजप नेत्यांनी शहरापासून १२ किलोमीटर दूरवर असलेल्या होटगी येथील जलसंपदा विभागाची सुमारे ५० एकर जागा आयटी पार्कसाठी निश्चित केली आहे. शिवसेना नेत्यांनी शहरात आयटी पार्क असावे, अशी भूमिका मांडली होती. तर, भाजप नेते होटगीतील जागेवर ठाम आहे. आयटी पार्कच्या जागेच्या मुद्यावरून भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे १० जुलैला उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सामंत काय भूमिका घेतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
