सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगी शिवारात ऊसाच्या पिकामध्ये लपवून केलेली गांजाची बेकायदेशीर शेती दक्षिण अक्कलकोट पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल २४० गांजाची झाडे आणि २११ किलो मुद्देमाल जप्त केला असून, बाजारात याची किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये आहे. या प्रकरणी शेताच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहिती अन् ऊसाच्या फडात छापा…
पोलीस अधीक्ष अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांचे पथक करजगी परिसर भागात गस्तीवर होते. आळगी हे महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे. त्या परिसरातून भीमा नदी वाहेत. नदीच्या पाण्यावर त्या संपूर्ण परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर आहे. आळगी गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने ऊसाच्या पिकाच्या आडून गांजाची लागवड केल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ या माहितीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित शेतात छापा टाकला.
१२ फुटांची झाडे पाहून पोलीसही अवाक…
संशयीत आरोपी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) याच्या ऊसाच्या शेतात पोलिसांनी पाहणी केली असता, उंचापुरा ऊस वाढलेल्या फडात ठिकठिकाणी तब्बल १० ते १२ फूट उंचीची गांजाची झाडे लावल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पंचनामा करत शेतातून २१० ओली जिवंत झाडे आणि ३० वाळलेली झाडे अशी एकूण २४० झाडे उपटून काढली. जप्त केलेल्या संपूर्ण साठ्याचे वजन २११ किलो १०० ग्रॅम झाले असून त्याचे बाजारमूल्यानुसार किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
या प्रकरणी दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे पुढील तपास करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सपोनि प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे, पोलीस अंमलदार शिवानंद मोसलगी, महादेव चिंचोळकर, प्रशांत कोळी, महादेव धुमाळ, बसवराज डोंगरीतोट, दीपक पाटील, लक्ष्मी हडपद, शिवलीला धनगर, अजिंक्य बिराजदार, नामदेव माने, मळसिद्ध कोळी, गणेश सुर्यंवंशी यांच्या पथकाने केली.
