सोलापूर : सोलापूर शहरातील तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला असून सुधारित दर ९ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे आकारले जाईल. चार वर्षांनंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन व प्रादेशिक परिवहन अधिकारी गजान नेरपगार यांनी घेतलेल्या या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उप- प्रादेशिक अधिकारी विजय पाटील उपस्थित होते.

सुधारित भाडेदर आणि नियम….

नवीन सुधारणेनुसार किमान भाडे ३० रुपये व पुढील प्रवासासाठी २० रुपये प्रति किलोमीटर असा दर राहील. महापालिका कार्यक्षेत्रात रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत २५ टक्के, तर ग्रामीण भागात रात्रीच्या प्रवासासाठी ४० टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. प्रवाशांसोबत असणाऱ्या ६० बाय ४० सेंटीमीटर आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सामानाच्या प्रति नगासाठी ५ रुपये शुल्क राहील.

मीटर तपासणीसाठी ६० दिवसांची मुदत

भाडेवाढ लागू झाल्यानंतर सर्व ऑटोरिक्षांना सुधारित दरानुसार इलेक्ट्रॉनिक मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करून घेण्यासाठी ९ ऑक्टोबर ते ८ डिसेंबर २०२६ पर्यंत ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत प्रवाशांच्या आणि चालकांच्या सोयीसाठी तात्पुरते दरपत्रक उपलब्ध केले जाईल. ८ डिसेंबरनंतर तात्पुरते दरपत्रक ग्राह्य धरले जाणार नसून केवळ मीटरनुसारच भाडे आकारणे बंधनकारक असेल; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांनी दिला.

ई-रिक्षा चालकांसाठी चारित्र्य पडताळणी अनिवार्य

शहरात सध्या सुरू असलेल्या १५३ ई-रिक्षांच्या चालकांना येत्या ६० दिवसांत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आणि अधिकृत बिल्ला घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. नवीन नोंदणी करणाऱ्या ई-रिक्षांनाही ही पूर्तता केल्यानंतरच मंजुरी दिली जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर बंदी; शहरात ६९ मार्गांवर सेवा…

ई-रिक्षांचा वेग ताशी २५ किलोमीटर इतका मर्यादित असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना राष्ट्रीय महामार्गांवर चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे, राष्ट्रीय महामार्ग वगळता उर्वरित जिल्हाभरात या रिक्षा धावू शकतील. शहातील दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वे स्थानक येथून नवीन ६१ रिक्षाथांबे निश्चित केले आहेत. सामायिक (शेअर) ई-रिक्षा योजना राबवली जाणार असून, त्याचे दरफलक प्रमुख ठिकाणी लावले जातील.

६१ नवीन रिक्षा थांब्यांना हिरवा कंदील

शहरातील ७९ प्रस्तावित ऑटोरिक्षा थांब्यांपैकी ६१ थांब्यांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित १८ प्रस्ताव अपुरी जागा, वाहतुकीस अडथळा अशा कारणांमुळे फेटाळण्यात आले. मंजूर थांब्यांवर महापालिकेतर्फे अधिकृत फलक आणि रिक्षांची संख्या दर्शवली जाणार आहे.

मीटरसाठी टाळाटाळ अन् जादा पैसे मागितल्यास करा तक्रार

प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, जादा भाडे मागणे अथवा गैरवर्तणुकीच्या तक्रारींसाठी प्राधिकरणाने संपर्क यंत्रणा जाहीर केली आहे. ऑटोरिक्षांमध्ये डिजिटल देयक फलक (क्यूआर संकेतांक) आणि मदत क्रमांक लावणे बंधनकारक असेल, नागरिकांनी ९४२०५६४५१३ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२१७-२३०३०९९ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवू शकतील, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.