सोलापूर : बालनाट्य दिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती (मुंबई) व सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा–२०२६’ या राज्यस्तरीय महोत्सवाची सोलापूर येथील प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित या स्पर्धेत बालकलाकारांनी आपल्या अभिनयातून आणि कलागुणांतून अहिल्यादेवींचा इतिहास रंगमंचावर हुबेहूब साकारला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली. प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी उपक्रमाची सविस्तर पार्श्वभूमी स्पष्ट केली. या प्रसंगी बालरंगभूमीच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार, कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, मुंबई नियामक मंडळाचे सुमित फुलमामडी, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ प्रशांत देशपांडे आणि सहकार्यवाह मच्छिंद्र सपताळे उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण करताना प्रा. अमोल देशमुख यांनी संवादफेक, स्पष्ट शब्दोच्चार, आवाजातील चढ-उतार आणि रंगमंचावरील वावर या तांत्रिक बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. तर इतिहास अभ्यासक व परीक्षक सुभाष माने यांनी नियमावलीचे काटेकोर पालन करून सादरीकरण अधिक प्रभावी करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात सीमा यलगुलवार यांनी, बालरंगभूमी परिषद हे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे सक्षम व्यासपीठ असल्याचे सांगत मध्यवर्ती अध्यक्षा नीलमताई शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा असल्याचे स्पष्ट केले.

विजेत्या व सहभागी कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार्यवाह संजय सावंत यांनी केले. या सोहळ्यास कार्यकारिणी सदस्य अन्नपूर्णा साखरे, मानसी निलंगेकर, कवी मारुती कटकधोंड यांच्यासह शिक्षक, पालक आणि बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

  • एकल गट क्र. १: स्नेहल कोळी (प्रथम)
  • एकल गट क्र. २: स्वामिनी भागानगरे (प्रथम)
  • समूह गट: एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल (प्रथम)