सोलापूर : कामगारांच्या किमान वेतनाच्या मुद्द्यावरून सोलापूरमधील विडी कारखानदारांनी १ सप्टेंबरपासून पुकारलेला बेमुदत बंद तूर्त स्थगित केला आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर विडी उद्योग संघाचे सचिव सुनील क्षत्रिय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बंद स्थगित झाल्याने कामगारांना नेहमीप्रमाणे विडी पान आणि तंबाखूचे वाटप सुरळीत सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सहायक कामगार आयुक्तांनी विडी कामगारांना प्रति एक हजार विड्यांमागे ३७९ रुपये किमान वेतन देण्याचे आदेश दिले होते. सध्या, कामगारांना प्रति हजार विड्यांमागे २४५ रुपये मजुरी मिळते. मात्र, वाढीव वेतनाची रक्कम व फरकासह देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली. धूम्रपानविरोधी कडक कायदे आणि बनावट विड्यांमुळे व्यवसाय आधीच डबघाईला आल्याने, वेतनवाढ लादल्यास उद्योग तेलंगणात हलवू अथवा बंद करू, असा इशारा देत कारखानदारांनी १ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन जाहीर केले होते.

​या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर कामगारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले होते. वाढीव वेतनामुळे उद्योग बंद पडून बेरोजगारी ओढवेल या भीतीने काही विडी कामगार महिलांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ‘वाढीव वेतन नको, रोजगार हवा’ अशी भूमिका घेत निदर्शने केली. तर दुसरीकडे ‘लाल बावटा विडी कामगार संघटने’ने माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शासनाने ठरवून दिलेले ३७९ रुपये वेतन मिळालेच पाहिजे, अन्यथा औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करू, असा पवित्रा घेतला होता. ​

खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. अखेर, जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घडवून आणण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत शासनाकडून सकारात्मक व व्यावहारिक तोडगा निघेल, असा विश्वास कारखानदारांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेला ओमशेठ तिवाडी, गोपाळ ब्रह्मभट्ट, बाळासाहेब जगदाळे, बालनरसय्या गड्डम, गणेश बत्तीन, राजेंद्र पटेल व देवीदास बुगडे उपस्थित होते.