सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाज, अर्थसंकल्पाचे नियोजन आणि नागरी प्रश्नांची मांडणी अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘केशवसृष्टी’ येथे ६ आणि ७ सप्टेंबर रोजी हा वर्ग पार पडणार असून, यामध्ये सोलापूरसह सांगली व कोल्हापूर महापालिकेतील सुमारे २०० नगरसेवक सहभागी होणार आहेत.

सोलापूर महापालिकेतील भाजपच्या ९४ नगरसेवकांचा यात समावेश असेल, अशी माहिती शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिली. सर्व नगरसेवक ५ सप्टेंबर रोजी ‘केशवसृष्टी’त दाखल होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होईल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर या प्रशिक्षणाची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली असून, पक्षाने सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

‘आयारामां’ना शिस्तीचे डोस

सोलापूर पालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्यांमध्ये इतर पक्षांतून आलेल्या ५० हून अधिक जणांचा समावेश आहे. पक्षांतर करून आलेल्या अनेक सदस्यांना भाजपची कार्यपद्धती आणि शिस्त अंगवळणी पडलेली नाही. सभागृहातील वर्तणूक, बैठकांना दांडी मारणे आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर यावरून पक्षात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, या नगरसेवकांना संघटनात्मक शिस्तीचे प्रशिक्षण असेल.

प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य….

  • महापालिकेचे कामकाज, अर्थसंकल्पीय तरतुदी आणि विकासकामांच्या तांत्रिक बाबी समजून घेणे.
  • प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारखे मूलभूत प्रश्न मांडून प्रशासकीय पाठपुरावा करण्याचे मार्गदर्शन.
  • केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य शिकवणे.

“शिस्त व संघटन हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न शासन-प्रशासन स्तरावर मांडणे, विषयांचा अभ्यास व पाठपुरावा करणे, याबाबत हे दोन दिवसांचे सखोल प्रशिक्षण मिळणार आहे. ५ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत स्वतः उपस्थित राहण्याबाबत पक्षाने सर्व नगरेसवकांना कळविले आहे.” — विनोद भोसले, नगरसेवक, भाजप सोलापूर