सोलापूर : काँग्रेसच्या कथित ‘फेक नॅरेटिव्ह’विरोधात भाजपने बुधवारी (दि.४) शहरात आयोजित केलेल्या मोर्चावरून सोलापूरचे राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तेत असताना जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी रस्त्यावर उतरून मोर्चे काढणाऱ्यांची वैचारिक दिवाळखोरी चव्हाट्यावर आली असून, आंदोलने करणारे प्रत्यक्षात ‘दिमागी पैदल’ आहेत, अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे, ऐन दिवाळीत गर्दीच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून हा मोर्चा काढण्याच्या भाजपच्या नियोजनावर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तथापि, मोर्चामुळे कोणालाही त्रास होणार नसून अवघ्या १५ ते २० मिनिटांत तो पुढे निघून जाईल; विरोधकांना केवळ पोटशूळ उठला आहे, असा प्रत्यारोप भाजप शहराध्यक्षांनी केला.
मंगळवारी सायंकाळी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “हातात सत्ता आणि निर्णयप्रक्रियेचे सर्व अधिकार असताना महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न मार्गी लावणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, मूलभूत प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडूनच मोर्चे काढले जात आहेत. लोकशाही व्यवस्थेतील हे अत्यंत हास्यास्पद आणि विसंगत चित्र असून, पराभवाच्या आणि जनतेच्या रोषाच्या भीतीतूनच हे राजकीय नाटक सुरू आहे,” असा टोला त्यांनी लगावला. सुजाण जनता या नाकर्तेपणाला मतपेटीतून चोख उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजली आहे. अशा मोक्याच्या काळात भाजपने बुधवारी दुपारी ४ वाजता सुमारे ३० ते ४० हजार कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, बसवेश्वर चौक, सराफा बाजार, भुसार गल्ली आणि समाचार चौक या प्रमुख मार्गांवरून सायंकाळी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. हा सर्व परिसर शहरातील मुख्य व्यापार केंद्र असून कपडे, फराळ, पूजा साहित्य आणि सराफा खरेदीसाठी येथे दररोज मोठी उलाढाल होते. ऐन सणाच्या तोंडावर काही तास जरी बाजारपेठ ठप्प राहिली, तरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल, अशी भीती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी व्यक्त केली. हा मोर्चा मध्यवर्ती भागाऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळवण्याची मागणीही त्यांनी केली.
खोटेपणा उघड होण्याच्या भीतीने विरोधकांना पोटदुखी : भाजप
“ऐन सणाच्या काळात व्यावसायिक आणि ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे. हा मोर्चा व्यापारी पेठेतून अवघ्या १५ ते २० मिनिटांत पुढे निघून जाईल. त्यामुळे कोणाचीही अडचण होणार नाही. मोर्चाला होणारी गर्दी आणि खोटारडेपणा उघड होण्याची भीती यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे,” असा पलटवार भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केला. तसेच, विकासाचा आव आणणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडून आल्यापासून शहरात कोणती ठोस कामे केली, ती जाहीर करावीत. शुभराय आर्ट गॅलरी पाडून अनेक वर्षे उलटली तरी त्या जागेवर अद्याप काहीही उभे राहिलेले नाही, हे सोलापूरकरांना ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
बुधवारी (दि.४) वाजता दुपारी ४ वाजता निघाणार्या या मोर्चाच्या नियोजनासाठी मागील आठ दिवसांपासून भाजपने महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांच्या वारंवार बैठक घेऊन तयारी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारयांना गर्दी जमविण्याचे मोठे उदिष्ट दिले होते.
