Petrol Diesel Short Supply Solapur / पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात ‘बफर स्टॉक’ उपलब्ध ठेवावा. तसेच दैनंदिन मागणीप्रमाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात इंधनपुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पंढरपुरातील पेट्रोल पंपावर अचानक तपासणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, काही पेट्रोल विक्रेत्यांकडून कंपनीने दररोज काही मर्यादेतच पेट्रोल, डिझेल विक्री करावी अशी बंधने घातल्याबाबतच्या तक्रारी आलेल्या आहेत. तरी सर्व संबंधित कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय पेट्रोल विक्रेत्यावर इंधन विक्रीचे कोणत्याही प्रकारची बंधने घालू नयेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येऊ नये, तसेच इंधनपुरवठा सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही सुरळीतपणे सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी, असे त्यांनी सुचित केले.
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असून कंपन्यांना दररोज नियमित मागणीप्रमाणे पेट्रोल डिझेल उपलब्ध केले जात आहे. विशेषत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेलचा अतिरिक्त साठा करून ठेवू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले आहे. तसेच सीएनजी गॅस पुरवठ्यातही कंपनीने मागणीप्रमाणे वाढ करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या अनधिकृत साठवणुकीसह काळाबाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकाकडून पेट्रोल विक्रेत्याकडून पेट्रोल डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आलेल्या होता, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर तपासणी केली. या ठिकाणी सर्व बाबी व्यवस्थित असल्याचे आढळून आले. तसेच पेट्रोलपंपांवर डिझेल खरेदीसाठी रांगा लागल्याने काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुकानिहाय संयुक्त भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.
