सोलापूर : भाजपच्या राजकीय लाभासाठी मतदार याद्यांमध्ये पद्धतशीर फेरफार करून देशात मोठ्या प्रमाणावर ‘मत चोरी’ केली जात असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. या गैरप्रकाराला जबाबदार असणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, तर लोकशाही व संविधानाशी खेळ केल्याप्रकरणी त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी केली. सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात आले. शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान ज्ञानेश कुमार यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला प्रतीकात्मक बेड्या ठोकून निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी बोलताना खासदार शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरून निवडणूक आयोग काम करत आहे. मतदार नोंदणीच्या ‘फॉर्म ६’ मध्ये नियमबाह्य बदल करून विरोधकांची मते पद्धतशीरपणे वगळण्यात आली असून, देशातील १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने हटवली गेली आहेत. आयोगातीलच दोन सहकाऱ्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्याने हा घोटाळा उघड झाला आहे.

“वोट चोरी म्हणजे केवळ मते चोरणे नसून देशाचा डीएनए व संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. पुढे त्या म्हणाल्या, “पेपरफुटी प्रकरणानंतर जशी धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली, तशी दुसरी विकेट आता ज्ञानेश कुमारांची जाणार आहे; तर तिसरी विकेट कोणाची पडणार हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही.” देशात दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीचे संकट असताना जनतेच्या मतदानाचा मूलभूत अधिकारच हिरावला जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.