सोलापूर : शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत कुमठा नाका परिसरातील भारत नगर येथून तब्बल ४८ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा ९६.९१ किलो ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुजमिल अल्ताफ शेख (वय २०) आणि निलोफर इरफान शेख (वय ३९, दोघे रा. घर क्र. ४००, भारत नगर क्रीडा संकुल जवळ, कुमठा नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरु केली आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार भारत नगर भागात गस्त घालत होते. त्यावेळी भारत नगर क्रीडा संकुलाच्या भिंतीजवळ एक तरुण घराबाहेर संशयास्पदरीत्या प्लास्टिकच्या पिशवीतून काही वस्तू विक्री करताना आढळला. पोलिसांच्या पथकाने मुजमिल शेख याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्या पिशवीत बोंडांसह असलेला काळपट-हिरवट रंगाचा गांजा आढळून आला.

चौकशीत त्याने घरात आणखी गांजा साठवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता निलोफर शेख ही महिला तेथे मिळून आली. घराच्या झडतीदरम्यान प्लास्टिक टेपने पॅक केलेली गांजाची एकूण ४८ पाकिटे जप्त करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाकडून प्राथमिक तपासणी केल्यानंतर जप्त केलेला साठा गांजा असल्याचे स्षष्ट झाले. पोलिसांनी एकूण ९६ किलो ९१ ग्रॅम गांजा आणि २५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४८ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव करत आहेत.

ग्रामीण पोलिसांनी दहा महिन्यांत २ कोटी ५१ लाखांचे अंमलीपदार्थ केले जप्त…

सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी १ जानेवारी ते आँक्टोंबर २०२६ दरम्यान जिल्ह्यात विविध ९१ ठिकाणी अंमलीपदार्थ विक्री करणार्यांवर कारवाई करून तब्बल २ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या आठवड्यात टेंभुर्णी येथील कारवाईत मेफोड्रोन ड्रग (एमडी) व रांजणी (ता. पंढरपूर) येथील कारवाईत साडेपाच किलो गांजा जप्त करण्यासह २५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तर, गेल्या महिन्यात अक्कलकोट तालुक्यातील आळगी शिवारात ऊसाच्या फडामध्ये गांजाची शेती करणार्यवर कारवाई केली होती. त्याकडून सुमारे एक कोटी रुपयांची २४० झाडांसह, २११ किलो मुद्देमाल ताब्या घेण्यात आला होता.