सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींच्या ठरावांवर भारतीय जनता पक्षातूनच आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. संबंधित गावांचे रहिवासी नसणे, संस्थेचे खातेदार, सभासद अथवा कर्जदार नसतानाही बेकायदेशीरपणे ठराव मंजूर केल्याचा दावा करत पुणे विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे या हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेच्या अखेरच्या दोन दिवसांत दाखल करण्यात आलेल्या या हरकतींमुळे भाजपच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुखांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणे या हरकती नोंदवल्या असून, संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रमुख दावेदारांना या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे.
तसेच, आमदार देशमुख यांनीही स्वतः देखील काही ठराव चुकीचे झाल्याबद्दलची थेट सहाय्यक निबंधकांकडे लेखी तक्रार केली आहे. या सर्व प्रकरणांत संबंधित व्यक्ती त्या-त्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी नसून शेतजमीन, कर्जदार वा खातेदार नसल्याचे पुरावे हरकतींसोबत जोडण्यात आले आहेत. विभागीय सहनिबंधक यावर काय निर्णय घेतात, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
स्थानिक रहिवासी नसलेल्या नावांवर ठराव
दाखल करण्यात आलेल्या हरकतींमध्ये अनेक ठरावांबाबत त्रुटी समोर आणण्यात आल्या आहेत:
- कर्नाटकचे रहिवासी प्रतिनिधी : औज (मं) सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून दादगौड जगदेव बिराजदार यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ते कर्नाटकातील रहिवासी असून, औज गावाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
- जमीन व रहिवासी पुरावे नसणे : होटगी स्टेशन सोसायटीतून ठराव झालेले सुरेश हसापुरे हे सोलापूरचे रहिवासी असल्याची तक्रार आहे. त्यांचे सुपुत्र सुदर्शन हसापुरे हे तिल्हेहाळ सोसायटीचे प्रतिनिधी असून, त्यांच्या नावावर त्या भागात शेतजमीन अथवा रहिवासी पुरावे नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
- इच्छुकांसमोर आव्हान : बँकेच्या निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे श्रीदीप सुरेश हसापुरे यांचा बोळकवठे सोसायटीतून ठराव करण्यात आला आहे. मात्र, ते स्थानिक रहिवासी, खातेदार वा कर्जदार नसल्याचा दावा करत राम गायकवाड यांनी त्यांच्या नावावर हरकत घेतली आहे.
या सोसायट्यांच्या प्रतिनिधींवरही हरकती….
- भंडारकवठे येथील रमेश गोविंद पाटील यांचा खानापूर सोसायटीतून झालेला ठराव.
- विंचूरचे रेवणसिद्ध हिंगमिरे यांचा अंत्रोळी सोसायटीतून झालेला ठराव आहे. ते तेथील रहिवासी अथवा खातेदार नसल्याचा आक्षेप.
- कुंभारीच्या उज्वला लिंगराज रामपूरे यांचा बोरूळ सोसायटीतून झालेला ठराव.
- सचिव प्रदीप श्रीमंत खूने यांच्या पत्नी सुनीता खूने यांचा चिंचपूर सोसायटीतून झालेला ठराव.
- विंचूरचे आमसिध बिराजदार यांचा शंकरनगर सोसायटीतून झालेला ठराव.
- कंदलगावचे महेश विभूते यांचा हिपळे सोसायटीतून, द्राक्षायणी बिराजदार यांचा बसवनगर सोसायटीतून, कस्तुराबाई जोकारे यांचा सादेपूर सोसायटीतून, तर बंकलगी येथील सचिव नागनाथ चडचणे यांचा सिंदखेड सोसायटीतून करण्यात आलेला ठराव.
