सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ जागांच्या संचालक मंडळासाठी तब्बल २३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विद्यमान सहा आमदारांसह अनेक माजी आमदार आणि त्यांच्या राजकीय वारसदारांनी निवडणुकीत उडी घेतल्याने सहकार क्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा प्राथमिक कृषी पतपुरवठा (विकास सोसायटी) मतदारसंघांत केवळ पिता-पुत्रांचेच अर्ज असल्याने या तीन जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बिनविरोध झाल्याचे फलक तयार करून समाजमाध्यद्वारे प्रसार करीत आहेत.
जिल्हा बँकेसाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. मुदतीच्या अखेरपर्यंत ५३९ अर्जांची विक्री झाली असून, छाननीअंती २३८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये उमेदवारांनी खबरदारी म्हणून भरलेले अतिरिक्त तसेच वेगवेगळ्या मतदारसंघांतील अर्जांचा समावेश आहे. २ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, सहकार कायद्यातील कलम ८८ अन्वये कोणतीही अनियमितता अथवा दोष सिद्ध झालेले उमेदवार निवडणुकीतून बाद होणार की मैदानात राहणार, हे स्पष्ट होईल. १७ नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.
उपनिबंधक कार्यालयात राजकीय शक्तिप्रदर्शन….
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह हजेरी लावल्याने उपनिबंधक कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते-पाटील कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत दाखल झाले. त्याच वेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत तसेच उमेश परिचारक आणि प्रणव परिचारक हेदेखील पंढरपूर तालुक्यातील समर्थकांसह पोहोचले. वाहनांच्या ताफ्यामुळे होम मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मोहिते-पाटील कुटुंबीय कार्यालयात असतानाच, एकेकाळी त्यांचे खंदे समर्थक राहिलेले आणि आता भाजपवासी झालेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यांनी माळशिरस सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी परस्परांकडे पाहणे टाळत आपापले अर्ज सादर केले.
आजी-माजी आमदारांचा सहकारात जम बसवण्याचा प्रयत्न….
जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांपैकी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी अर्ज भरले आहेत. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदारांमध्ये प्रशांत परिचारक, संजयमामा शिंदे, राजन पाटील, दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, श्यामल बागल, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि राम सातपुते यांनी उमेदवारी दाखल करून निवडणुकीतील चुरस वाढवली आहे.
वारसदारांची मोठी फळी मैदानात….
या निवडणुकीत राजकीय वारसदारांची मोठी फळी पाहायला मिळत आहे. यामध्ये पृथ्वीराज दिलीप माने, विक्रांत राजन पाटील, अजिंक्यराणा राजन पाटील, सिद्धेश्वर बबनराव आवताडे, सुशील बबनराव आवताडे, रणवीर राजेंद्र राऊत, रणजित बबनराव शिंदे, यशवंत संजयमामा शिंदे, सूर्यादित्य दीपक साळुंखे-पाटील, श्रीदीप हसापुरे, मनीष सुभाष देशमुख, प्रणव मुकुंद परिचारक, शंभूराजे जयवंत जगताप, अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते-पाटील, अनिकेत चंद्रकांत देशमुख, जयकुमार ब्रह्मदेव माने, संजीव सिद्रामप्पा पाटील, शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी, सिद्धाराम चाकोते, भारती राजशेखर शिवदारे, मिनल गणपत साठे, रश्मी दिगंबर बागल आणि इंदुमती परमानंद अलगोंडा यांचा समावेश आहे.
या मतदारसंघात थेट लढतींची शक्यता…
• दक्षिण सोलापूर विकास सोसायटी : श्रीदीप हसापुरे विरुद्ध भारती शिवदारे
• उत्तर सोलापूर विकास सोसायटी : पृथ्वीराज माने विरुद्ध बाबासाहेब पाटील
• सांगोला विकास सोसायटी : आमदार बाबासाहेब देशमुख विरुद्ध इतर १० उमेदवार
• पंढरपूर विकास सोसायटी : परिचारक गट विरुद्ध कल्याण काळे
• माढा विकास सोसायटी : रणजित शिंदे विरुद्ध गणपत साठे व भारत शिंदे
•माळशिरस विकास सोसायटी : मोहिते-पाटील विरुद्ध शहाजीराव देशमुख
• करमाळा विकास सोसायटी : शंभूराजे जगताप विरुद्ध सुभाष गुळवे
• अक्कलकोट विकास सोसायटी : आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध संजीव पाटील
तीन तालुके बिनविरोधच्या मार्गावर…
• मोहोळ : माजी आमदार राजन पाटील व त्यांचे सुपुत्र विक्रांत पाटील यांचेच अर्ज असल्याने विक्रांत पाटील यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते.
• बार्शी : आमदार राजेंद्र राऊत व सुपुत्र रणवीर राऊत यांचे अर्ज असून येथे आमदार राऊत बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
• मंगळवेढा : बबनराव आवताडे आणि त्यांची दोन मुले सिद्धेश्वर व सुशील यांचे अर्ज आहेत; येथून सिद्धेश्वर आवताडे बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
तीन ठिकाणी वाटाघाटींतून तोडग्याची शक्यता….
• उत्तर सोलापूर : माजी आमदार दिलीप माने व त्यांचे भाचे धनंजय भोसले यांचे अर्ज आहेत. कलम ८८ च्या कारवाईचा अडसर आल्यास भोसले यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. तसेच पृथ्वीराज माने व बाबासाहेब पाटील यांच्यातील चर्चेनंतर हा मतदारसंघ बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
• पंढरपूर : परिचारक गटाविरुद्ध कल्याण काळे रिंगणात आहेत. वाटाघाटी झाल्यास प्रशांत परिचारक, उमेश परिचारक किंवा प्रणव परिचारक यांच्यापैकी एकाची बिनविरोध निवड होऊ शकते. कलम ८८ च्या निर्बंधांनुसार परिचारक गटाकडून पर्यायी उमेदवाराचा विचार होईल.
• करमाळा : माजी आमदार जयवंतराव जगताप व मुलगा शंभूराजे यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे रिंगणात आहेत. कलम ८८ चा पेच आणि संभाव्य राजकीय वाटाघाटींनंतर येथेही बिनविरोध निवडीची चिन्हे दिसू शकतात.
आमदार कल्याणशेट्टींच्या महत्वकांक्षेला माजी आमदार पुत्राचा खोडा…
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जिल्हा बँक संचालकासह, अध्यक्षपदाची प्रबळ महत्वकांक्षा सर्वश्रृत आहे. कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे.पण, त्याच मतदारसंघात भाजपचे माजी आमदार दिवंगत सिद्रामप्पा पाटील यांचे सुपूत्र संजीव पाटील यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. पूर्वी भाजपमध्ये असणारे पाटील कुटुंबीय आता मोहिते-पाटील यांच्या समवेत आहेत. तालुक्यातील सहकारी सोसायटीवर पाटील कुटुंबाचे वर्चस्व होते. पण, कल्याणशेट्टी सहकार क्षेत्रात स्वतःचा विस्तार वाढवला आहे. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व मोहिते-पाटील यांच्यासह काही अदृश्यशक्तींची साथ पाटील यांना मिळाल्यास कल्याणशेट्टीचा बिनविरोध होण्याचा मार्गात अडथळे वाढू शकतात.
