सोलापूर : “सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सहकार, दूध संघ आणि जिल्हा परिषदेत यापूर्वी प्रत्यक्ष काम केलेल्या ज्येष्ठ जाणकारांशी आमची सविस्तर चर्चा सुरू आहे. सध्या फक्त उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, माघारीसाठी तब्बल १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, हा केवळ ‘टिझर’ आहे; अजून खरा ट्रेलर आणि संपूर्ण ‘पिक्चर’ बाकी आहे,” असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवट दिवस होता, त्यानिमित्ताने उपनिबंधक कार्यालयात राजकीय घडामोडींना वेग आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना मोहिते-पाटील यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आरोपांमागची ‘अर्धी माहिती’ उघड करत थेट आव्हान दिले. अर्जांची छाननी बाकी असून उमेदवारी मागे घेण्यासाठी अजून १५ दिवसांचा अवधी असल्याने, पडद्यामागील तडजोडींमधून निवडणूक बिनविरोध होणार की दोन्ही आघाड्यांमध्ये राजकीय राजकीय सामना रंगणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘कल्याणशेट्टींनी मूळ बाजू लपवली’…

गेल्या आठवड्यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, “विधानपरिषद निवडणुकीवेळी ती बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना फोन केला होता, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मोहिते-पाटील यांच्या धोरणांमुळेच बँक अडचणीत आली असून, आता शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचा भास निर्माण करत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले जात आहे. मोहिते-पाटील शांत बसले तर बँक आपोआप बिनविरोध होईल, असे आरोप कल्याणशेट्टी यांनी केले होते. या आरोपाचा समाचार घेताना खासदार मोहिते-पाटील म्हणाले, “कल्याणशेट्टी सांगत आहेत ते खोटे नाही, पण त्यांनी पत्रकारांना अर्धीच माहिती दिली. मी काही अपक्ष निवडून आलेलो लोकप्रतिनिधी नाही. माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. विधानपरिषदेवेळी स्वतः सचिन कल्याणशेट्टी, मंत्री उदय सामंत आदींचे मला फोन आले होते. त्या वेळी मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, तुम्ही थेट शरद पवार यांच्याशी चर्चा करा; पवार साहेबांनी जर निर्णय दिला, तर मी दुसऱ्याच क्षणाला अर्ज मागे घेईन आणि निवडणूक बिनविरोध होईल. हाच निरोप मी दिला होता, मात्र कल्याणशेट्टींनी पत्रकार परिषदेत ही मुख्य बाजू सोयीस्करपणे लपवून ठेवली, असा पलटवार खासदार मोहिते-पाटील यांनी केला. “

‘जाणकारां’च्या नावाखाली नवख्यांना अप्रत्यक्ष टोला?

सहकार आणि दूध संघात ज्यांनी दीर्घकाळ काम केले आहे, अशा जुन्या जाणकारांशी चर्चा सुरू असल्याचे सांगत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पहिल्यांदाच संचालक होण्यासह थेट बँकेच्या अध्यक्षपदाची तीव्र महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार राजेंद्र राऊत यांना अप्रत्यक्ष फटकारल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, सहकारातील ‘जाणकार’ असा उल्लेख करून मोहिते-पाटील यांचा रोख माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख तसेच माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दिशेने असावा, अशा राजकीय शक्यता वर्तवल्या जात आहेत.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे बोलके मौन…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात आलेले भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकारांनी त्यांना जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधाच्या हालचाली आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली. मात्र, त्यावर कोणतीही थेट प्रतिक्रिया न देता, त्यांनी बाजूला उभे असलेले खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यादिशेने इशारा करीत “तेच बोलतील,” असे इशाराद्वारे सांगत पूर्ण मौन बाळगणे पसंत केले. रणजितसिंहांच्या या मौनाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

उपनिबंधक कार्यालयाला जत्रेचे स्वरूप…

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उपनिबंधक कार्यालय परिसरात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक, ज्येष्ठ उद्योजक उमेश परिचारक, माजी आमदार ॲड. धनाजी साठे तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख आदी दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.