सोलापूर : सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी संचालकांच्या उमेदवारीवर घेण्यात आलेल्या अपात्रतेच्या हरकतींनी राजकीय व कायदेशीर चुरस वाढवली आहे. कलम ८८ अन्वये आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई न्यायप्रविष्ट असताना आणि संबंधित उमेदवारांनी रक्कम भरण्याची तयारी दर्शवूनही बँकेने ती स्वीकारण्यास नकार दिला असताना त्यांना अपात्र कसे ठरवता येईल, असा प्रश्न माजी संचालकांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

उच्च न्यायालयाचे संरक्षण, कलम १५२ अन्वये दाखल अपील आणि बँकेवर नियुक्त झालेल्या तीन स्वतंत्र प्रशासकांचा कार्यकाळ या कायदेशीर मुद्द्यांचा आधार घेत या हरकती फेटाळण्याची मागणी करण्यात आली. या सर्व हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून संबंधित उमेदवारांच्या अर्जांवरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत अर्जावरील सुनावणी चालली होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल २३८ अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्यासमोर झाली. सोसायटी मतदारसंघातील प्रमुख माजी संचालकांच्या उमेदवारीवर महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम ८८ आणि कलम ११० (अ) अन्वये आक्षेप नोंदवण्यात आले होते. यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी प्रदीर्घ युक्तिवाद केला. या सुनावणीमध्ये १४ अर्ज बाद झाले असून १८१ अर्ज वैध ठरले. ४३ अर्जांवर सुनावणी झाली असून मंगवारी त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी, तर माजी आमदार संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, सुरेश हसापुरे व बबनराव आवताडे यांच्यावतीने अ‍ॅड. उमेश मराठे यांनी बाजू मांडली.

कलम ८८ अन्वये आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करणाऱ्या आदेशाविरोधात उमेदवारांनी कलम १५२ अन्वये अपील दाखल केले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश दिले असल्याने अपील आणि स्थगिती अर्जाचा निर्णय होईपर्यंत संबंधितांना न्यायालयाचे संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे केवळ कलम ८८ चा आदेश प्रलंबित आहे म्हणून उमेदवारी अर्ज बाद ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. कुलकर्णी यांनी केला.

दरम्यान, बँकेचे संचालक मंडळ २०१८ मध्ये बरखास्त झाल्यानंतर तीन वेगवेगळ्या प्रशासकांची स्वतंत्र आदेशांद्वारे नियुक्ती झाली. दोन कार्यकाळांच्या अपात्रतेची तरतूद लागू करताना या स्वतंत्र नियुक्त्यांचाच विचार करावा लागेल. तिन्ही प्रशासकांचा काळ एकच सलग धरून अपात्रतेची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवता येत नाही, असा तांत्रिक मुद्दाही त्यांनी मांडला.

याशिवाय, बँकेवर मे २०१८ मध्ये प्रशासक नियुक्त होण्यापूर्वीच, म्हणजे मार्च-एप्रिल २०१८ मध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, प्रशांत परिचारक, बबनराव आवताडे आणि सुरेश हसापुरे यांनी संचालकपदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे कलम ११० (अ) अन्वये त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई लागू होत नाही, याकडे अ‍ॅड. मराठे यांनी लक्ष वेधले. आता या सर्व कायदेशीर पेचांवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निकाल देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पैसे भरण्याची तयारी, तरीही बँकेचा नकार

रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, सुरेश हसापुरे, बबनराव आवताडे आणि दिलीप माने यांनी बँकेची रक्कम भरण्याची तयारी दर्शवून २८ ऑक्टोबर रोजी बँकेला लेखी पत्र दिले होते. मात्र, बँकेने ३० ऑक्टोबर रोजी पत्र देत ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. उमेदवार भरणा करण्यास तयार असताना बँकेनेच नकार दिला आणि दुसरीकडे थकबाकीचे कारण पुढे करून अपात्रतेचा आक्षेप घेतला जात आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. मराठे यांनी केला.

प्रमुख नेत्यांचे अर्ज निर्णयासाठी राखीव

सोसायटी मतदारसंघातील रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, जयवंतराव जगताप, दिलीप माने, प्रशांत परिचारक, सुरेश हसापुरे, रश्मी बागल, बबनराव आवताडे, बाबासाहेब पाटील, रणजित शिंदे तसेच अनुसूचित जाती मतदारसंघातील माजी आमदार राम सातपुते यांच्या अर्जांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. या सर्व अर्जांवरील निर्णय मंगळवारी जाहीर केला जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.