सोलापूर : सहकार कायदा कलम ८८ आणि ११० ‘अ’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारल्याने सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले आहेत. जुन्या पिढीतील दिग्गज नेत्यांचे अर्ज बाद झाल्याने बँकेच्या सत्तेचे दरवाजे त्यांच्यासाठी तात्पुरते बंद झाले असले, तरी बहुतांश नेत्यांनी आधीच खबरदारी म्हणून आपल्या राजकीय वारसदारांना रिंगणात उतरविल्याने आता ही निवडणूक नव्या पिढीच्या हाती केंद्रित झाली आहे.
कलम ८८ आणि ११० ‘अ’ चा अडथळा कायम; बचावाचा युक्तिवाद अमान्य….
सोलापूर जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. सर्वांचे लक्ष लागलेल्या सोसायटी मतदारसंघासह इतर जागांवरून माजी संचालकांनी भरलेल्या अर्जांवर मंगळवारी निकाल देण्यात आला. छाननी प्रक्रियेदरम्यान माजी संचालकांच्या वतीने ॲड. उमेश मराठे, ॲड. अभिजित कुलकर्णी व ॲड. अभय इनामदार यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.
या मुद्यांवर झाला युक्तीवाद…
- अपवादात्मक राजीनाम्याचा दावा.: मे २०१८ मध्ये कलम ११० ‘अ’ अन्वये संचालक मंडळ बरखास्त झाले असले, तरी कारवाईपूर्वीच (एप्रिलमध्ये) संचालकांनी राजीनामे दिले होते; त्यामुळे दोन टर्मच्या अपात्रतेची कारवाई लागू होत नाही, असा युक्तिवाद मांडण्यात आला.
- वसुली भरण्याची तयारी: कलम ८८ अन्वये निश्चित झालेली २३२ कोटींची वसुली रक्कम भरण्यास माजी संचालक तयार होते, मात्र ‘ही रक्कम भरून घेता येणार नाही’ असे बँकेने ३० ऑक्टोबरला पत्राद्वारे कळवले होते, याकडे लक्ष वेधण्यात आले.
- प्रथमच संचालक झालेले नेते: कलम ११० ‘अ’ अंतर्गत बरखास्त समितीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे पहिल्यांदाच संचालक झाले होते, असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे युक्तिवाद फेटाळून लावत ज्यांच्यावर कलम ८८ आणि ११० ‘अ’ अन्वये सुनावणी व कारवाई प्रलंबित आहे, त्या सर्व माजी संचालकांचे अर्ज नामंजूर केले.
यांचे अर्ज झाले नामंजूर…
माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी संचालक सिद्धाराम म्हेत्रे, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल आणि बबनराव अवताडे.
विद्यमान आमदार व नेत्यांचे अर्ज मंजूर….
जिल्हा बँकेत संचालक होण्यासह, अध्यक्षपदाची तीव्र इच्चा असणारे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत (बार्शी), अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी सहकारमंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख (नागरी बँका), पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे (कृषी पणन व नागरी बँका), सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख (सांगोला सोसायटी), खासदार धैर्यशील मोहिते-पाटील (दुग्ध संस्था), तसेच शहाजी पवार आणि मनीष देशमुख (दोघेही नागरी बँका) यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत. तसेच, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते (सोसायटी सभासदत्व आक्षेप), रणजितसिंह शिंदे (जगदंबा सुतगिरणी देणी आक्षेप), शहाजीराजे देशमुख आणि बाबासाहेब पाटील (उत्तर सोलापूर) यांच्या अर्जांवरील हरकती फेटाळत त्यांचेही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
वारसदारांच्या माध्यमातून सत्तेचे सूत्र हाती ठेवण्याची रणनीती….
स्वतःचे अर्ज कायदेशीर पेचात अडकणार याचा अंदाज आल्याने मातब्बर नेत्यांनी आधीच ‘प्लॅन बी’ तयार ठेवून आपल्या मुला-मुलींना आणि नातेवाइकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. जुन्या पिढीचे अर्ज बाद झाल्यामुळे आता त्यांच्या राजकीय वारसदारांच्या खांद्यावर थेट धुरा आली आहे:
जिल्ह्याचे सहकार- राजकारणातील धाकली पाती…
- पृथ्वीराज माने (माजी आमदार दिलीप माने यांचे सुपुत्र)
- विक्रांत पाटील (माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र)
- प्रणव परिचारक (माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे)
- शंभूराजे जगताप (माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र)
- श्रीदीप हसापुरे (सुरेश हसापुरे यांचे सुपुत्र)
- सिद्धेश्वर अवताडे (बबनराव अवताडे यांचे सुपुत्र)
- यशवंत शिंदे (माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र)
- रणजित शिंदे (माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपूत्र)
- सूर्यदित्य दीपक साळुंखे (दीपक साळुंखे यांचे सुपुत्र)
- शामल बागल (रश्मी बागल यांनी स्वतःचा अर्ज बाद होण्याची शक्यता गृहीत धरून आई शामल बागल यांची महिला राखीवमधून उमेदवारी कायम ठेवली आहे)
- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व अर्जुनसिंह मोहिते-पाटील (रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःऐवजी बंधू खासदार धैर्यशील आणि अर्जुनसिंह यांना मैदानात सक्रिय केले आहे.
पुढील लढाई सहनिबंधकांकडे…
ज्या माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत, त्यांच्याकडे आता विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागण्याचा कायदेशीर मार्ग खुला आहे. सहनिबंधक कार्यालयात हे नेते कदाचित कायदेशीर लढा सुरू ठेवतील. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मात्र जुन्या नेत्यांच्या सावलीत वाढलेली नवी पिढी आता समोरासमोर भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
