सोलापूर : सोलापूर जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत गुरुवारी राजकीय दिग्गजांची मोठी गर्दी उसळली. माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी संचालक राजशेखर शिवदारे यांच्या पत्नी भारती शिवदारे यांच्यासह गुरुवारी एकाच दिवशी ५४ अर्ज दाखल झाले. यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ६९ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांसाठी २ हजार ५९६ मतदार आहेत. निवडणुकीसाठी आतापर्यंत ५१६ अर्जांची विक्री झाली असून गुरुवारी १०८ अर्जांची विक्री झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा  शुक्रवार (दि. ३०) शेवट दिवस असल्याने उर्वरित सर्व इच्छुक आणि माजी संचालक आपले अर्ज स्वतः किंवा सुचकांमार्फेत दाखल करणार आहेत. दरम्यान, अद्याप अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांसह त्यांच्या गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत; त्यामुळे शेवटच्या दिवशी नेमके कोण रिंगणात उतरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर माजी आमदार राजन पाटील यांची दोन्ही मुले विक्रांत आणि अजिंक्यराणा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या प्रचंड शक्तिप्रदर्शनात, घोषणाबाजीत अर्ज दाखल केले.

रिंगणात कोण-कोण?…

गुरुवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये अनेक नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, भारती शिवदारे, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत, कल्याणराव काळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, कन्हैय्यालाल देवी, शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक अमोल शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड आदींचा समावेश आहे. यापैकी बहुतांश प्रमुख नेतेमंडळींनी सुचकमार्फेत अर्ज दाखल केले.

बिनविरोधची चर्चा, पण अध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा आडवी…

मोहोळ तालुका सोसायटी  मतदारसंघातून अर्ज दाखल केल्यानंतर विक्रांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली. सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी एकत्र येऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वपक्षीय चर्चेचे संकेत दिले होते.

दुसरीकडे, सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये दोष निश्चित न झालेल्या माजी संचालकांना अपात्रतेच्या कारवाईतून दिलासा मिळावा, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व समविचारी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. कलम ८८ चा अडसर आणि दुष्काळी परिस्थिती पाहता, अनेक माजी संचालक स्वतःऐवजी घरातील इतर सदस्यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

नवोदितांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यापेक्षा आपापसांत जागावाटप करून निवडणूक बिनविरोध काढण्याबाबत प्राथमिक सहमती दिसत असली, तरी भाजपच्या आमदारांसह प्रमुख नेत्यांची अध्यक्षपदासाठी असलेली तीव्र महत्त्वाकांक्षा पाहता, जागावाटपाचे घोडे अडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.