सोलापूर : मान्सूनचा मुख्य कालावधी संपूनही परतीच्या पावसाने ओढ दिली आहे. कमाल तापमान सातत्याने ३५ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहिल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक गडद झाली आहे. ऑक्टोबर हीटच्या कडक उन्हाचे चटके आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, खरिपाची पिके डोळ्यांदेखत करपून गेली आहेत. तीव्र उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने सोलापूरची ओळख असलेला रब्बी हंगामही संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खरीपमधील पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू केले असून, पाणीटंचाई निवारणासाठी उजनी धरणातील ३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. जिल्ह्यात मध्यंतरी काही भागात पावसाच्या मध्यम ते हलक्यासरी बरसल्याने जलसाठ्यांत कोणतीही वाढ झाली नाही. भूगर्भातील जलपातळी खालावल्याने ग्रामीण भागात विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने बळीराजासह सर्वसामान्य जनताही हवालदिल झाली आहे.
प्रत्येक बाधित पिकाचा पंचनामा…
महसूल आणि कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून आतापर्यंत नऊ टक्के काम पूर्ण झाले आहे. “शेतात नुकसान झालेल्या प्रत्येक पिकाचा कोणताही जाचक निकष किंवा अट न लावता पंचनामा केला जाईल. पहिले पीक वाया गेल्यावर ज्यांनी दुबार पेरणी केली, अशा शेतकऱ्यांचाही यात समावेश असेल. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
८६ टँकर सुरू, ४८ तासात मंजुरीचे आदेश
ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन मागणी येताच ४८ तासांत टँकर सुरू करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या ८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आणखी १३ टँकर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आगामी काळातील पाणीटंचाईच्या मुकाबला करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांची तपासणी सुरू आहे. गुरांच्या चाऱ्याचा संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन चारा लागवडीस प्रोत्साहन दिले आहे. सध्या जिल्ह्यात १०० दिवसाचा चारा उपलब्ध आहे. साखर कारखाना गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर आहे वैरणाचा प्रश्न थोडा फार सुटू शकेल. रेशन कार्डधारकांना अतिरिक्त धान्य पुरवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर माहिती संकलित करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
तापमानातील चढता आलेख…
२ ऑक्टोबर : ३७
१ ऑक्टोबर : ३६.८
३० सप्टेंबर :३५.४
२९ सप्टेंबर : ३१.६
२८ सप्टेंबर : ३५.८
२७ सप्टेंबर : ३६.६
२६ सप्टेंबर : ३५.८
२५ सप्टेंबर : ३५.८
