सोलापूर : कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या दीर्घ खंडामुळे यंदाच्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल ९ लाख २० हजार ४२३ शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीने बाधित झाले आहेत. ८ लाख २ हजार ८३५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तातडीने सावरण्यासाठी सुमारे १ हजार १६७ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शासकीय नियमांनुसार कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेत बाधित क्षेत्राची माहिती संकलित करण्यात आली आहे. यात जिरायत, बागायती आणि फळपिकांच्या नुकसानीची वर्गवारी निश्चित करण्यात आली असून, यंदा बागायती पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बार्शी तालुक्यात सर्वाधिक नुकसान…
तालुकानिहाय आकडेवारीत बार्शी तालुक्यात सर्वाधिक १ लाख १ हजार ४२१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याखालोखाल अक्कलकोट (८५,३२२ हेक्टर), मोहोळ (८५,२१७ हेक्टर), करमाळा (८२,०८० हेक्टर) आणि माढा तालुक्यात ८१ हजार ५१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याशिवाय सांगोला (७७,८६४ हेक्टर), पंढरपूर (७०,४२९ हेक्टर), माळशिरस (६८,०४३ हेक्टर), मंगळवेढा (६२,३८४ हेक्टर), दक्षिण सोलापूर (३४,७९८ हेक्टर) आणि उत्तर सोलापूर तालुक्यात २७ हजार ३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडून निधी मिळताच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
_ जिरायत पिके : जिल्ह्यातील ३ लाख १३ हजार ६८३ हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाले असून ३ लाख ९ हजार ३६२ शेतकरी प्रभावित झाले आहेत. या क्षेत्रासाठी २६६ कोटी ६३ लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव आहे.
_ बागायती पिके : सर्वाधिक नुकसान बागायती क्षेत्राचे झाले असून ३ लाख ६३ हजार १८४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल ४ लाख ५१ हजार ८६४ शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, भरपाईपोटी ६१७ कोटी ४१ लाख रुपयांची आवश्यकता आहे.
_ फळपिके : १ लाख २५ हजार ९६७ हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्याने १ लाख ५९ हजार १९७ बागायतदार अडचणीत आले आहेत. फळपिकांच्या नुकसानीपोटी २८३ कोटी ४२ लाख रुपयांची मागणी नोंदवण्यात आली आहे.
