सोलापूर : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन यांसह इतर पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दुष्काळाची थेट दाहकता आता जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाणवू लागली असून ऐन हंगामात बाजार आवारात कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सोलापूर, बार्शी, करमाळा आणि अक्कलकोट (दुधनी) या प्रमुख बाजार समित्यांमधील व्यापारी गाळे रिकामे पडले असून शेतीमालाच्या आवकेत मोठी घट झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि बाजार घटकांचे आर्थिक चक्र पूर्णपणे कोलमडले आहे. करमाळा बाजार समितीत उडदाची आवक निम्म्याहून कमीकरमाळा तालुक्यात पावसाने दगा दिल्याने कोरड्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. गतवर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाची आवक ३० हजार ७१० क्विंटल झाली होती, तर यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत ही आवक अवघी १४ हजार १५२ क्विंटल इतकीच नोंदवली गेली आहे. तसेच, गेल्यावर्षी गहू, ज्वारी, उडीद, मका, तूर आदी जिन्नसांची ३ लाख ३० हजार ६२३ क्विंटल आवक झाली होती, त्या तुलनेत यंदा एप्रिल ते सप्टेंबर अखेर ६ महिन्यांत केवळ ७० हजार ९८७ क्विंटल आवक झाली आहे. सुमारे पावणेतीन लाख क्विंटलने आवक घटल्याने बाजार समितीच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.

अक्कलकोट-दुधनी भागातही बिकट अवस्था…

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही हेच भीषण वास्तव समोर येत आहे. एरवी खरिपाच्या हंगामात गजबजणाऱ्या दुधनी बाजार समितीत सध्या शुकशुकाट पसरला आहे. शेतात उत्पादनच न निघाल्याने शेतकरी जेमतेम एक-दोन पोती शेतीमाल घेऊन बाजारात येत आहेत. बाजारात तूर, उडीद, सोयाबीनची अत्यल्प आवक होत असून खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.

सोलापूर व बार्शी बाजार समित्यांतील गाळे ओस…

सोलापूर जिल्हा मुख्यालयातील मुख्य बाजार समितीसह बार्शी येथील नामांकित डाळ व तेलबिया बाजारपेठेतही हीच परिस्थिती आहे. बार्शी ही प्रामुख्याने उडीद, मूग आणि सोयाबीनच्या मोठ्या सौद्यांसाठी ओळखली जाते. मात्र यंदा स्थानिक पातळीवर उत्पादनच न झाल्याने आवक नगण्य राहिली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर-आँक्टोंबर महिन्यात ८०० पेक्षा अधिक कट्टे सोयाबीणची आवक होती. पण, यंदा जणू शुकशुकाट आहे. तेलबीयांचे प्रमाणे अत्यल्प असल्याने तेल, डाळींच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. तसेच, पुढीलवर्षी शेतकर्यांन पेरणीसाठी चांगले, दर्जेदार बियाणे मिळणे देखील मुश्किल झाले आहे, असे, व्यापार्यांनी सांगितले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही आवक घटल्याने शेतमालाचे लिलाव लवकर आटोपत असून व्यापारी गाळे रिकामे दिसत आहेत.हमाल, तोलारी आणि मजुरांचा रोजगार संकटातबाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक घटल्याने केवळ शेतकरी आणि व्यापारीच नव्हे, तर माल उतरवणे, पोती भरणे, वजन करणे, वाहतूक करणे या कामांवर अवलंबून असणारे हमाल, तोलारी व महिला मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला पुरेसे काम नसल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अडचणीत सापडला आहे.

“दुष्काळामुळे शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. याचा फटका शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मजुरांसह बाजार समितीशी संबंधित सर्वच घटकांना बसला आहे.”- मल्लिकार्जुन बाके, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुधनी (अक्कलकोट).

“विक्रीसाठी पुरेसा शेतीमाल बाजारात येत नसल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल कमालीची कमी आहे. पूर्वीच्या तुलनेत यंदा व्यवहारांचे चक्र पूर्णपणे बिघडले आहे.”- श्रीकांत होशेट्टी, शेतीमाल व्यापारी.