सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून बाधित शेती क्षेत्राचे १०० टक्के पंचनामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. नमुना पाहणी न करता महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जिओ-टॅगिंगद्वारे प्रत्यक्ष नुकसानीची अचूक नोंद करावी, असेही त्यांनी बजावले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

थेट बांधावर जाऊन पंचनामे…

तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून पंचनामे करणे बंधनकारक आहे. ‘एसआयआर’चे कामकाज असलेल्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस वगळता उर्वरित पूर्ण वेळ केवळ दुष्काळी पंचनाम्यांसाठीच द्यावा. कामात पारदर्शकता आणि गती राखण्यासाठी प्रत्येक पथकाने दररोज सायंकाळी झालेल्या पंचनाम्यांचा सविस्तर गोषवारा वरिष्ठांकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.

टँकर मंजुरीसाठी ४८ तासांची मुदत…

टंचाईग्रस्त भागातून टँकर मागणीचे प्रस्ताव टपालाने पाठवून विलंब करू नये; ते संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे समक्ष पोहोचवावेत. अधिकाऱ्यांनी अशा प्रस्तावांना ४८ तासांत मंजुरी देणे बंधनकारक असून, मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे. प्रत्येक टँकरला ‘जीपीएस’ प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून, अरुंद व लहान अंतर्गत रस्त्यांसाठी लहान आकाराच्या टँकरचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

चारा व पाणी साठ्याचे नियोजन

जिल्ह्यात सध्या १०० ते १२० दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. चारा टंचाई भासू नये म्हणून बियाणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उजनी धरणात ९२ टक्के पाणीसाठा असला, तरी तालुक्यातील मध्यम व लघू प्रकल्पांतील उपलब्ध साठ्याचे नियोजन करून सोमवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्यांची किमान २५० कामे आणि ‘व्हीजी रामजी’ योजनेतील दुष्काळ निवारक कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. ९२ गावांत ८२ टँकर सुरू जिल्ह्यातील ९२ गावांमध्ये सध्या टंचाई निवारणासाठी उपाययोजना लागू असून ८२ टँकर, ३३ विहिरी व १३ बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

तालुका, गाव व टँकर संख्या

  • सांगोला: १९ गावांत २४ टँकर
  • मंगळवेढा: १६ गावांत १८ टँकर
  • माढा: १३ गावांत १३ टँकर
  • करमाळा: ११ गावांत ८ टँकर (८ विहिरी, २ बोअर)
  • उत्तर सोलापूर: ५ गावांत ७ टँकर
  • माळशिरस: ७ गावांत ७ टँकर
  • बार्शी: १२ गावांत २ टँकर (५ विहिरी, ५ बोअर)
  • अक्कलकोट: ८ गावांत २ टँकर
  • दक्षिण सोलापूर: १ गावात १ टँकर
  • मोहोळ व पंढरपूर: सध्या एकही टँकर सुरू नाही.