सोलापूर : खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बीचीही आशा मावळल्याने दुष्काळाच्या तीव्र छायेत सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यात खासगी सावकारी व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. बँकांकडून तातडीने कर्ज मिळणे आव्हानात्मक होत असल्याने आर्थिक विळख्यात अडकलेल्या शेतकर्यांना पुन्हा सावकारांच्या दारात उभे रहावे लागण्याची शक्यता असून, गेल्या अवघ्या दोन महिन्यांत जिल्ह्यात ७८ नव्या सावकारांची नोंद झाली आहे. तर, सावकारी परवान्यासाठी सहकार विभागाकडे आणखी तब्बल १२७ नवीन अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सावकारीचे जाळे वेगाने विस्तारत आहे.
गेल्या एक-दोन वर्षांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान केले होते. यंदा मात्र पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने जिल्ह्याला तीव्र कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कर्जमाफीचे जाचक निकष, जुनी थकीत कर्जे आणि सिबिलच्या अडचणींमुळे राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना तातडीने पतपुरवठा होणे कठीण बनले आहे. ऐन दुष्काळात शेती वाचवण्यासाठी आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी शेतकऱ्यांपुढे खासगी सावकार तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. शेतकऱ्यांच्या याच हवालदील स्थितीचा गैरफायदा खासगी सावकारांकडून घेतला जात आहे.
जिल्ह्यात अधिकृत परवानाधारक सावकारांशिवाय बेकायदा सावकारी करणाऱ्यांचे जाळेही मोठ्या प्रमाणावर विस्तारत असल्याची भीती व्यक्त होत आहे. शहर आणि ग्रामीण भागात नव्या सावकारांचे पेव फुटले असून, वाढत्या अर्जांमुळे सहकार दरबारी सावकारी व्यवसायाला अधिकृत रूप देण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. एकीकडे दुष्काळाचे संकट तीव्र वाढत आहे. तर दुसरीकडे शेतकरी पुन्हा सावकारी पाशात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
व्याज आकरण्याची नियमावली…
- शेतकऱ्यांसाठी : परवानाधारक सावकारांना शेतकऱ्यांकडून तारण कर्जावर वार्षिक कमाल ९ टक्के तर विनातारण कर्जावर १२ टक्के व्याज आकारता येते.
- इतरांसाठी : शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना तारण कर्जावर वार्षिक १५ टक्के आणि विनातारण कर्जावर १८ टक्के व्याज आकारण्याची मुभा आहे. याहून अधिक दराने व्याज आकारणी करणे बेकायदेशीर ठरते.
“सावकारीबाबतच्या तक्रारी सहकार विभागाकडे येत असतात. दाखल तक्रारींनुसार संबंधित तालुका निबंधक कार्यालयामार्फत थेट छापे टाकून चौकशी केली जाते. या चौकशीच्या आधारे सावकारीच्या केसेस चालवून कागदोपत्री पुराव्यांची तपासणी करून पुढील कायदेशीर निर्णय घेतले जातात. बुधवार, गुरुवारी उपनिबंधक कार्यालयात सावकारी केसची सुनावणी सुरु असते. – मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
तालुकानिहाय सावकारांची स्थिती
| तालुका | नवीनअर्ज | नूतनीकरण | एकूण सावकार |
| शहरसोलापूर | ४४ | ४२० | ४६४ |
| अक्कलकोट | १४ | ८४ | ९८ |
| बार्शी | १० | ८७ | ९७ |
| अकलूज | ०६ | ७६ | ८२ |
| पंढरपूर | ०७ | ६८ | ७५ |
| सांगोला | ०९ | ३१ | ४० |
| दक्षिण सोलापूर | ०१ | ३८ | ३९ |
| उत्तरसोलापूर | ०४ | १७ | २१ |
| मंगळवेढा | ०६ | २१ | २८ |
| करमाळा | ०३ | २४ | २८ |
| मोहोळ | ०४ | १८ | २२ |
| एकूण | १२७ | ७९६ | १०९५ |
