सोलापूर : खरीप हंगामात दुष्काळामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान २ नोव्हेंबरपासून थेट बँक खात्यांत जमा करण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, या मदतीच्या वाटपावरून नवा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. एका सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या सर्व सामाईक खातेदारांना प्रत्यक्ष वहिवाटीनुसार स्वतंत्रपणे ही मदत देण्यात यावी; अन्यथा हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी मागणी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते’ समितीचे सांगोला विधानसभा सह-अध्यक्ष ॲड. सचिन देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
राज्य शासनाने २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत होत असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर सामाईक सातबारा उताऱ्यांचा तिढा समोर आला आहे. ग्रामीण भागात अनेक शेतजमिनींवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक खातेदारांची नावे नोंद आहेत. बहुतांश ठिकाणी पिढ्यान्पिढ्या जमिनींची आपापसात वाटणी होऊन शेतकरी स्वतंत्रपणे मशागत व पेरणी करत आहेत. मात्र, महसूल दप्तरी स्वतंत्र सातबारा उतारा झालेला नसल्याने ही मदत उताऱ्यावरील केवळ एकाच मुख्य खातेदाराला मिळून प्रत्यक्ष राबणाऱ्या इतर सह-खातेदारांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीचा फटका जमिनीची वहिवाट करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे केवळ स्वतंत्र सातबारा नसल्याच्या तांत्रिक कारणावरून इतर खातेदारांना वगळणे अन्यायकारक ठरेल, असा असा आक्षेप ॲड. देशमुख यांनी नोंदवला आहे. महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष वहिवाट व इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक खातेदाराला स्वतंत्र मदत द्यावी, तसेच याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तातडीने स्पष्ट लेखी मार्गदर्शक सूचना द्याव्या, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.
२ नोव्हेंबरपासून थेट खात्यात मदत जमा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २ नोव्हेंबरपासून प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत जमा करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. पात्र बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर १०० टक्के अपलोड करण्यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी, शनिवार व रविवारीही सर्व प्रांत व तहसील कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत एसआरचे कामकाज व याद्यांची पडताळणी पूर्ण करून एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
