सोलापूर : पावसाने दिलेली प्रदीर्घ ओढ आणि उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा गंभीर दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर असतानाच, संकटात सापडलेल्या बळीराजाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन शनिवारी थेट बांधावर उतरले आहे. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये १२ आणि १३ सप्टेंबर असे दोन दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दुष्काळसदृश परिस्थितीची क्षेत्रीय पाहणी सुरू असून, वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतांमध्ये जाऊन शनिवारी दुपारी पाहणी केली. बोरामणी, धोत्री, वळसंग, कोण्हाळी, कुरनूर आणि नाविंदगी या गावांना भेटी देत सोयाबीन, ऊस आणि मका पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पेरणीनंतरचा पावसाचा खंड, जमिनीतील ओलाव्याची स्थिती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याविषयी त्यांनी शेतकऱ्यांशी बांधावर बसून थेट संवाद साधला.

अहवाल तयार करण्यात येणार असल्याने जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, तर निवासी उपजिल्हाधिकारी तीन तालुक्यांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आपापल्या कार्यक्षेत्रात ठाण मांडून माहिती संकलित करत आहेत. सध्या जिल्ह्यात ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, परिस्थितीनुसार ही संख्या वाढवण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. या पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तहसीलदार विनायक नगर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा; प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

उजनी शंभर टक्के, तरीही पिकांना फटका

उजनी धरण यंदा शंभर टक्के भरले असून, अतिरिक्त पाण्याच्या विसर्गातून जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के लघु पाणी प्रकल्प भरून घेण्यात आले आहेत. मात्र, पावसाच्या मोठ्या खंडामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे धरण तुडुंब भरलेले असतानाही पावसाअभावी शेतातील उभी पिके करपण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

“जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून अचूक अहवाल शासनाकडे पाठवावा आणि शासनानेही दुष्काळाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.” – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट

“शासनाच्या निकषांनुसार कमी पाऊस आणि पावसातील खंड हे दुष्काळ परिस्थितीचे महत्त्वाचे ट्रिगर मानले जातात. माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी हे तालुके ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये येऊ शकतात. त्यामुळे तेथील परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला तातडीने सादर केला जाईल.” – एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी, सोलापूर