सोलापूर: थकबाकी असलेल्या ऊस बिलाच्या रक्कमेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. गोकुळ शुगरकडून थकीत बिले मिळत नसल्याचा आरोप करत हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी सोलापुरात झाडावर चढून आंदोलन सुरू केले. बील मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी रोखठोक आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
सन २०२३ ते २०२५ या दोन वर्षातील २७० शेतकऱ्याचे १ कोटी ९७ लाख थकीत बिल आहेत. यासंदर्भात साखर आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. केवळ आश्वासने पदरात पडत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आंदोलनाचा हा टोकाचा मार्ग अवलंबला.
”कारखान्याने आमचा ऊस नेला, साखर विकली, पण घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे मात्र वर्षानुवर्षे अडकवून ठेवले आहेत. बँकांची कर्जे, मुलांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा हाकणे मुश्कील झाले आहे. दत्ता शिंदे यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला.
शेतकरी झाडावर चढल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार किरण जमदाडे यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पण, शेतकऱ्यांनी मान्य केले नाही. या आंदोलनात ॲड अमोल पाटील (वागदरी), अरविंद घोडके (अणदूर), हनुमंत बिराजदार, भीमाशंकर आलुरे, काशिनाथ माने, अभिजीत सावळी, मल्लिनाथ शीलवंत, शरणाप्पा नागूर आदी शेतकरी आंदोलनात सक्रिय होते.
पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ठोस लेखी आश्वासन आणि कायदेशीर कारवाईच्या हमीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, साखर कारखानदारांच्या मनमानीविरोधात जिल्ह्यातील इतर शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
