सोलापूर – दुष्काळ, भूजल पातळीतील मोठी घट आणि वाढता उत्पादन खर्च या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत उभी केलेली केळीची बाग बाजारभावाअभावी मातीत गाडण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी मोहन ढेकळे यांनी उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने आपल्या चार एकरांतील खोडवा केळीच्या उभ्या बागेवर रोटाव्हेटर फिरवून घड जमिनीत मिसळले. तर, दुसरीकडे, करमाळा तालुक्यातही आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीत अडथळे निर्माण झाले असून, तेथील केळी लागवड क्षेत्रात यंदा मोठी घट झाली आहे.

लाखो रुपयांचा खर्च, पदरी अवघा दोन-पाच रुपये दर

पापरी येथील मोहन ढेकळे यांनी चार एकर क्षेत्रातील केळीच्या पहिल्या पिकानंतर खोडव्याचे पीक घेतले होते. यंदा पावसाअभावी भूजल पातळी खालावली असतानाही उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्यांनी बाग जगवली. घडांना आधार देण्यासाठी १० हजार रुपये खर्चून प्लॅस्टिक पट्ट्या बांधल्या होत्या, तर काढणीपूर्वी ८० हजार रुपयांची अतिरिक्त खते दिली होती. खोडवा पिकासाठी एकूण २ लाख रुपये खर्च झाले होते.

बागेतील घड काढणीस तयार झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी इराण-इराक युद्ध आणि निर्यातबंदीचे कारण सांगत २५ किलोच्या कॅरेटला अवघे ५०-६० रुपये, म्हणजेच प्रतिकिलो दोन ते पाच रुपये इतकाच दर देऊ केला. शिवाय, केळी बागेतून काढून बाहेर आणून देण्याची अट घातली. घड उतरवणे आणि वाहतुकीचा खर्च पाहता हा दर तोट्याचा ठरत असल्याने त्यांनी बाजारात माल नेण्याऐवजी बागेवर रोटाव्हेटर फिरवणे पसंत केले. यातून केवळ १७ हजार रुपयांची केळी विकली गेली, तर चार एकरांतील बाग जमिनीत गाडण्यासाठी आणखी ५० हजार रुपये खर्च करावे लागले. या खोडवा पिकातून सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

करमाळा तालुक्यात केळी लागवड क्षेत्रात मोठी घट; उत्पादक अडचणीत….

उजनी धरण लगतच्या करमाळा तालुक्यातही केळी उत्पादकांची परिस्थिती गंभीर बनली आहे. उजनी जलाशयाचा पट्टा असतानाही पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि भूजल पातळी खालावल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी नवीन लागवडीबाबत सावध भूमिका घेत आहेत. करमाळा तालुक्यात २०२३-२४ मध्ये १६ हजार ८२० हेक्टर, २०२४-२५ मध्ये २०,३५३ हेक्टर आणि २०२५-२६ मध्ये २०,७९० हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. मात्र, यंदाच्या वर्षात हे क्षेत्र घटून थेट ५,१११ हेक्टरवर आले आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर भाडे ६ हजार डॉलर्सवर पोहोचले आहे. माल पोहोचण्यास पूर्वी १० दिवस लागायचे, तिथे आता ४० दिवस लागत आहेत. परिणामी निर्यात कोलमडली असून स्थानिक बाजारात केळीचे भाव गडगडले आहेत.

“दुष्काळात उपलब्ध पाण्याचे नियोजन करत आणि लाखो रुपये खर्च करून आणलेल्या शेतीमालास अपेक्षित दर मिळत नसल्याने जर पिके मातीत गाडावी लागत असतील, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या अनेक वर्षे मागे जाईल.” – मोहन ढेकळे, शेतकरी, पापरी (ता. मोहोळ)

“इराण-इराक देशांतील युद्धामुळे आणि निर्यातबंदीमुळे केळीचे दर पडले आहेत. सध्या लागवडीच्या केळीला प्रतिकिलो ६ ते ७ रुपये व खोडव्याला ३ ते ४ रुपये दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती निवळल्यानंतर दरात हळूहळू वाढ अपेक्षित आहे.” – गोरख हैदळे, केळी व्यापारी