सोलापूर : प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांचे गैरहजेरीचे सत्र, प्रसुती टाळून रुग्णांची होणारी परवड, अत्यावश्यक औषधांचा तीव्र तुटवडा आणि आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांची होणारी पिळवणूक; अशा विविध कारणांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत उघडकीस आला. या अनागोंदीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य प्रशासनाची तीव्र शब्दांत कानउघडणी केली. “शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या कामचुकारांना सेवेतून थेट घरी बसवा; नवीन तरुणांना संधी देऊ,” असा इशारा देत दोषींवर तातडीने कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.
‘सोलापूर-सांगली आरोग्य जनसंवाद यात्रा’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार ज्योती वाघमारे, आमदार उत्तमराव जानकर, आमदार अभिजित पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सेवा संचालक डॉ. कंदेवाड, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
गैरहजर वैद्यकीय अधिकारी रडारवर…
बैठकीत वडाळा ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे १०० रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी असतानाही संबंधित वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडली. यापूर्वी पिंपळनेर आरोग्य केंद्रात असतानाही संबंधित डॉक्टरांचे वर्तन असेच होते, याकडे सदस्य अण्णा ढाणे यांनी लक्ष वेधले. त्यावर या वैद्यकीय अधिकाऱ्याची तत्काळ चौकशी करून कारवाईचे निर्देश मंत्र्यांनी दिले. नरखेड (ता. मोहोळ) आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला नियमित ओपीडी आणि प्रसुतींची साधी आकडेवारीही सांगता न आल्याने, “तुम्ही डॉक्टर म्हणून काम करता की फक्त गणवेश घालून बसला आहात?” असा संताप व्यक्त करत त्यांच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले.
वैरागमध्ये औषधांचा तुटवडा; डीएचओंची कानउघडणी
वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, तिथे साधे ‘टीटी’चे इंजेक्शन आणि जीवनावश्यक औषधेही उपलब्ध नसल्याचे समोर आले. शासनाकडून निधी व साहित्याचा पुरवठा होत असताना तुटवडा का निर्माण झाला, अशी विचारणा करत आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांची झाडाझडती घेतली. औषध खरेदी प्रक्रियेसह संपूर्ण दप्तर तपासणीचे आदेश देत, प्राथमिक केंद्रांत प्रसुती टाळून गरोदर मातांना विनाकारण जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी ताशेरे ओढले.
आशा स्वयंसेविकांची पिळवणूक; बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा
अधिकाऱ्यांकडून आशा स्वयंसेविकांवर नियमबाह्य कामांचा बोजा लादणे, कारवाईचा धाक दाखवून मानधन अन्य कामांसाठी वर्ग करणे आणि मानधनातून मनमानी कपात करणे, अशा गंभीर तक्रारी बैठकीत समोर आल्या. यावर संतप्त होत आबिटकर यांनी डॉ. कोपूरवाड यांना सखोल चौकशी करून तातडीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच ग्रामीण व शहरी भागातील बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांत धडक मोहीम राबवून थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.
जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयाची पाहणी
बैठकीनंतर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा महिला रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नव्याने सुरू झालेली कॅथलॅब, अतिदक्षता विभाग तसेच विविध वॉर्डांमध्ये जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मोफत औषधे मिळतात का, उपचारांबाबत काही तक्रारी आहेत का, याची विचारपूस केली. तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन कक्ष, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत शासकीय रुग्णालयांवर सामान्यांचा विश्वास वाढेल अशा पद्धतीने दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन डॉक्टरांना केले.
