सोलापूर – सोलापूर येथील शासकीय महिला व नवजात शिशू रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी स्वतंत्रपणे भेटी दिल्या. दोन्ही मंत्री एकाच वेळी संयुक्त पाहणीसाठी जाणार असल्याचे पूर्वनियोजित असताना, ऐनवेळी झालेल्या या स्वतंत्र दौऱ्यामुळे प्रशासकीय वर्तुळासह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबसह नेत्र विभाग आणि अतिदक्षता विभागाची पाहणी करून उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा डोईफोडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर हे खासगी डॉक्टरांच्या बैठकीत व्यस्त होते, तर पालकमंत्री गोरे यांना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी वेळेत पोहोचायचे असल्याने दोन्ही मंत्र्यांनी स्वतंत्र भेटी दिल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. शिवसेना (शिंदेगट) अमोल शिंदे यांनीही दोन्ही मंत्री एकत्र रुग्णालयाच्या भेटीसाठी जाणार होतो. पण, बैठकांमुळे दोघांची वेळ पुढे-मागे झाली. पण, त्या दोघांनी एकमेकांची भेट घेऊन संवाद साधला, असेही नगरसेवक शिंदे यांनी सांगितले.

प्रशासकीय व्यस्तता की राजकीय दुरावा ?

प्रशासनाने दिलेले कारण तांत्रिक असले तरी राजकीय वर्तुळात यामागील अंतर्गत संघर्षाची चर्चा रंगली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने ‘युतीधर्म’ पाळला नसल्याची उघड नाराजी पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केली होती. त्यापूर्वी झालेल्या पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत भाजपच्या व शिवसेना (शिंदेगट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली होती. शिंदे सेनेचे सचिन सानप यांच्या उमदेवारीवरून पालकमंत्री गोरे यांनी केलेल्या टिकेचे पश्चिम महाष्ट्रात पडसाद उमटले होते. त्यापाठोपाठ सोलापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही घटक पक्षांमध्ये श्रेयवादाची चढाओढ पाहायला मिळाली होती.

होटगी येथील प्रस्ताविक आयटी पार्क सोलापूर शहरामध्ये असावे,त्यासाठी तज्ज्ञांची समिती जागेची पाहणी करेल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सागिंतले होते. तर, पालकमंत्री गोरे यांनी आग्रहाने होटगी येथील जागा शासनाकडून मंजूर करून घेतली. अलीकडच्या काळामघ्ये सोलापूर जिल्ह्यातील काही माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा डाँ प्रणिता भालके, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील आदी आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे.

सोलापूर महापालिकेतही शिवसेना (शिंदे गट) भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला धारेवर धरण्यात आघाडीवर आहे. सातारा आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांतील बदलती राजकीय समीकरणे आणि वाढता दुरावा पाहता, दोन्ही मंत्र्यांचा हा स्वतंत्र दौरा केवळ प्रशासकीय ‘योगायोग’ होता की त्यामागे पूर्वनियोजित ‘राजकीय अंतर’, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.