सोलापूर : मध्य प्रदेशातून गावठी बनावटीची पिस्तुल आणून सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरात बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीस अकलूज पोलिसांनी अटक केली. या कारवाईत मध्य प्रदेशातील मुख्य पुरवठादारासह एकूण ८ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण १८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सोलापूरातील अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावरील संगम फाट्याजवळ गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून एका कारसह विकास कैलास वजाळे (रा. परीते, ता. माढा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २ पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. वजाळेकडे केलेल्या सखोल चौकशीत, हा शस्त्रसाठा त्याने मध्य प्रदेशातील बडवाणी येथील पुरवठादार अनिल पंचलाल मेहता याच्याकडून राहुल सतीश माने (रा. मिरज, जि. सांगली) याच्या मध्यस्थीने खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.
धुळ्यातून पुरवठादारास ताब्यात…
तपासादरम्यान पुरवठादार अनिल मेहता हा मध्य प्रदेशातून धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विशेष पथक रवाना केले. सोनगीर येथे सापळा रचून मेहता याला ताब्यात घेण्यात आले; त्याच्याकडील पिशवीतून ४ पिस्तुले आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
खरेदीदारांवरही कारवाईचा बडगा…
मेहताच्या चौकशीनंतर, सांगलीच्या उमदी येथील गुन्ह्यात फरार असलेला त्याचा साथीदार राहुल सतीश माने (वय ३४, रा. मिरज) हा टेंभुर्णी परिसरात शस्त्रविक्रीसाठी आला असता पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्या चौकशीच्या आधारे शस्त्रे खरेदी करणाऱ्या महादेव कोरके (रा. करकंब, ता. पंढरपूर), विजय किरणगी (रा. शिवणपूर, जि. बेळगाव), सुमित लवटे (रा. सांगोला), प्रदीप पांडुरंग माने (रा. चिकमहूद, ता. सांगोला) आणि शनि बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून उर्वरित शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने सर्व संशयीत आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, उपनिरीक्षक विशाल कदम, अंमलदार श्रीराम पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, स्वप्नील गायकवाड, अनिल शिंदे आणि प्रवीण मेटकरी यांच्या पथकाने केली. पुढील तपास अकलूज पोलीस करत आहेत.
